बुलढाणा : पाकिस्तानला चोख जबाब देण्याचे काम भारतीय लष्कर करत आहे. बंदुकीच्या गोळ्यांना तोफगोळ्यांनी सडेतोड उत्तर देणारा हा आधुनिक भारत आहे. पाकिस्तानने भारतीयांच्या नादी लागू नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावले.

बुलढाणा जिल्ह्यातील इसरूळ (ता. चिखली) येथे संत चोखामेळा यांचा पुण्यतिथी सोहळा १० मे ते १८ मे पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. संत चोखोबाच्या जन्मभूमीत, अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या वाणीतून शिवचरित्र अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उज्ज्वल इतिहस कथन केल्या जात आहे. या कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी हजेरी लावली.

या कार्यक्रमादरम्यान गिता परिवार संस्थेच्यावतीने नीलेश महाराज झरेकरे यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदे, केद्रीयमंत्री प्रताप जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमादर संजय गायकवाड, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जाधव, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माया म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकनाथ शिदे पुढे म्हणाले की, अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. मी पंढरीचा कार्यकर्ता आहे, सत्ता पंढरीचा नाही. यापुढेही मी समाजाच्या प्रत्येक कामासाठी सदैव तयार राहील. आम्ही ‘टीम’ म्हणून काम करत आहोत आणि यापुढे करत राहणार. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो. लडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. धार्मिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाच्या लष्कराच्या मागे खंबीरपणे उभे राहणे हे तुमचे आमचे कर्तव्य आहे. देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात आपल्या बहिणीचे कुंकु पुसणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले, असेही त्यांनी सांगितले. समाज प्रबोधनाचे काम वारकरी संप्रदाय करत आला आहे. त्यामुळेच आपण या संत परंपरेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येथे आल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाला वारकरी संप्रदायाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.