बुलढाणा: जिल्ह्यातील मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गांवर एक कार ट्रेलरवर धडकून झालेल्या भीषण अपघातात चार ठार तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतकमध्ये वाहन चालकाचा समावेश असून घटनेतील अन्य ३ मृतकांची ओळख पटू शकली नाही. १७ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मुक्ताइनगरकडून मलकापूरकडे जाणा-या या रोडवर ही भीषण दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत कार चालक साजिद अजीज बागवान यासह तीन महिला अशा चौघाचा जागीच मृत्यू झाला. हे प्रवासी मारूती ईको कारने (क्र. एम एच ४६ एक्स ३१२०) प्रवास करीत होते. दरम्यान चालक साजिद अजीज बागवान याचे नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात समोर असलेल्या मोठ्या ट्रेलरला पाठीमागून धडकली.
गंभीर जखमी मध्ये संतोष तेजराव महाले वय ४० वर्ष राहणार चिखली तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगांव, पंकज दिलीप गोपाळ वय २२वर्ष राहणार नांद्रा हवेली, तालुका जामनेर, जिल्हा जळगांव,दीपिका विश्वास वय ३० वर्ष कलकत्ता पष्चिम बंगाल, टीना अजय पाटील, वय ४५ वर्ष राहणार भुसावळ जिल्हा जळगाव यांच्या समावेश आहे.
एका जखमी महिलेची ओळख पटू शकली नाही. जखमी वर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेया प्रकरणी मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी चौघाच्या मृत्यूस कारणीभूत चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार हेमराज कोळी ठाणेदार करीत आहे.