बुलढाणा: बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने प्रतिबंधित गुटखा विरोधातील कारवाई तीव्र केली आहे. अश्याच एका मोठ्या कारवाईत चिखली नजिक तब्बल ६१ लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा व वाहन मिळून ८० लाख रुपयांचा मुद्धे माल जप्त करण्यात आला. गुटखा तस्करीचे केंद्र मध्यप्रदेश राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
चिखली पोलीस ठाणे हद्धीत स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने ही कारवाई केली आहे. मध्य प्रदेश मधून प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पथकाने बुलढाणा चिखली राज्य मार्गावर सापळा रचला. बुलढाणा चिखली मार्गावरील हॉटेल रयत नजिक स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला एक टाटा आयशर ट्रक पकडला . या वाहनाची तपासणी करण्यात आल्यावर त्यात गुटख्याचा मोठा साठा असल्याचे आढळून आले. या मालाचा ‘बाजारभाव’ ६१ लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले. या वाहना मधील माल जप्त करण्यात आला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुन्हा ‘एमपी’च!
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे मध्य प्रदेश ‘कनेक्शन’ या कारवाईने पुन्हा सिद्ध झाले आहे. या घटनेतील आरोपी सईद खान रशीद खान हा देवास (मध्यप्रदेश )मधील रहिवासी आहे. तसेच पकडण्यात आलेले वाहन सुद्धा मध्यप्रदेश मध्ये नोंदणी झालेले आहे. महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना अशा प्रकारे त्याची अवैध वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सखोलपणे केला जाईल आणि गुटख्याच्या अवैध व्यापारात सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जाईल.
ट्रकमधील माल कोठून आणला गेला आणि तो कोठे नेण्यात येणार होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही याची वाहतूक करुन अवैधपणे विक्री सुरु आहे. चिखली पोलिसांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या कारवाया केल्या असून, अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यापाराला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा अवैध गोष्टींची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.