बुलढाणा : महायुती व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील खलबते, बैठकांना उत आला असतानाच बुलढाण्यातील उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याचे वृत्त आहे. बुलढाण्याचा युती व आघाडीच्या उमेदवारांची घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. यातही आघाडीमध्ये उलटफेर होण्याचे संकेत मिळाले आहे.
बुलढाणा मतदारसंघातील जागावाटप व उमेदवारीचा गुंता प्रारंभीपासूनच गाजला. महायुतीचा तिढा तर थेट दिल्लीपर्यंत गाजला. निवडणुका तोंडावर आल्यावर बुलढाण्याची जागा शिंदे गटाला व उमेदवार प्रतापराव जाधव, असे स्पष्ट झाले. मात्र, याची घोषणा होण्यात मनसेचा अडसर आला. मुंबईत गुरुवारी आयोजित बैठकीत मनसेची अडचण कायम असल्याचे शिंदे गटाच्या सूत्रांनी सांगितले. मनसे मागत असलेल्या जागा या शिंदे गटाशी संबधित आहेत. मनसेचा नाशिकवरदेखील डोळा आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच ‘इंजिन’ने विधानसभेबाबत चर्चेचा मुद्दा देखील पुढे केला आहे. यामुळे गुरुवारी होणारी बुलढाणा व अन्य ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे. याला दोन दिवस लागण्याची शक्यताही सूत्रांनी बोलून दाखविली.
हेही वाचा – रायगडात शेकापला लागलेली गळती थांबेना
आघाडीतील गुंता अन् संभाजी ब्रिगेड
महायुतीप्रमाणेच महाआघाडीतही उमेदवारीचा गुंता आहे. संभाजीनगरमध्ये बुधवारी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्याकडे बुलढाणा व हिंगोली मतदारसंघ देण्याची मागणी केली. ठाकरे यांनी बुलढाणा दौऱ्यावर असताना बुधवारी सिंदखेडराजा येथील मराठा सेवा संघाच्या ‘जिजाऊ सृष्टी’ला भेट दिली. ब्रिगेडच्या बुलढाण्यातील संभाव्य उमेदवार माजी आमदार व मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अर्धांगिनी रेखा खेडेकर या राहणार हे उघड रहस्य आहे. आता या नवीन मित्राचे कसे समाधान करायचे? हा पेचही ठाकरेंसमक्ष आहे. यामुळे उमेदवारीचा गुंता आणखी वाढला आहे.
हेही वाचा – प्रिया दत्त सध्या आहेत कुठे? पक्षांतराच्या चर्चांवर दत्त यांचे उत्तर
हेही वाचा – रामटेकमध्ये काँग्रेसला धक्का, संभाव्य उमेदवाराला नोटीस
अदलाबदलीचा प्रस्ताव!
उद्धव ठाकरे गटाचा सध्याचा संभाव्य उमेदवार हा ‘इलेक्टिव्ह मेरिट’चा नसल्याचे काँग्रेसनेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे रामटेक शिवसेनेला तर बुलढाणा काँग्रेसला, असा प्रस्ताव ठाकरे गटाकडे देण्यात आल्याचे समजते. तशी अदलाबदल होण्याची अंधुक का होईना पण शक्यता आहे. तसे झाल्यास जयश्री शेळके यांना संधी आहे. त्यांच्याशीवाय श्याम उमाळकर व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, ठाकरे बुलढाण्यावर ठाम राहिलेच तर काँग्रेसचा नेता रीतसर मनगटावर ‘शिवबंधन’ बांधून अन् हाती मशाल घेऊन लढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत प्रतापराव जाधव यांना पराभूत करायचे आहे. जाधव जिंकले तर तो ठाकरेंचा पराभव ठरणार आहे. या संपूर्ण गुंतागुंतीमुळे उमेदवारीची घोषणा व्हायला दोन दिवस लागणार, अशीच चिन्हे आहेत. उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेले शिवसेना संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी दोन दिवसांच्या मुदतीला दुजोरा दिला.