बुलढाणा: जागा वाटप व उमेदवारीवरून अखेरपर्यंत चर्चेत राहिलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार असल्यावर आज शिक्कामोर्तब झाले. आज शिवसेना (उबाठा) तर्फे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले नरेंद्र खेडेकर यांचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर असल्याने सेनेने निष्ठा या निकषावर त्यांची निवड केल्याचे स्पष्ट झाले. ते पहिल्यांदाच मोठ्या लढतीत उतरत आहे. चिखली विधानसभामध्ये उमेदवारीने त्यांना हुलकावणी दिली आहे.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

हेही वाचा – महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

शिवसेनेचा सामान्य सैनिक, जिल्हाप्रमुख अशी मजल मारणाऱ्या खेडेकरांचा राजकीय आलेख चढ उताराचा राहिला. मात्र जिल्हा परिषद वर्तुळात त्यांनी अनेक वर्षे दबदबा कायम ठेवला. तीनदा बाजी मारणारे खेडेकर जिल्हा परिषदचे विरोधी पक्ष नेते , बांधकाम सभापती आणि २००९ ते १२ या काळात ‘झेडपी’चे अध्यक्ष झाले. मध्यंतरी त्यांनी सेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र नंतर ते पुन्हा सेनेत परतले. सध्या ते ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज त्यांना थेट लोकसभेचे ‘तिकीट’ मिळाले आहे. दरम्यान ‘उद्धवजींचा विश्वस सार्थ ठरवू, गद्दाराना जमिनीत गाडू’ अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली.