लोणार : पौराणिक वारसा लाभलेल्या लोणार शहरात उद्या (१६ मे) पासून किरणोत्सव रंगणार आहे. मात्र, हा उत्सव मानवी ‘इव्हेंट’ नसून तो नैसर्गिक उत्सव आहे.त्याला पुरातन भारतीय स्थापत्य शास्त्र, खगोल शास्त्र याचा मिलाफ देखील म्हणता येईल. येथील पुरातन दैत्यसूदन मंदिरात हा सूर्य किरणांचा अद्भुत खेळ रंगणार आहे. श्री चरणी शहस्त्र सूर्य किरणे प्रकाश रुपी अभिषेक करणार आहे. यामुळे हा किरणोत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरवरचे पर्यटक आणि भाविक सरोवर नगरीत डेरेदाखल होत आहेत.

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेले लोणार शहरात केवळ जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवरच आहे, असा कुणाचाही समज असेल तर तो चुकीचा आहे. लोणार सरोवरात आणि सभोवताली अनेक प्राचिन मंदिरे आढळून येतात, त्यातीलच एक आहे सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन मंदिर म्हणजे दैत्यसूदन मंदिर.

शेकडो वर्ष जुने असलेले हे मंदिर शहराचा एक अनमोल ठेवा आहे. या मंदिराची कलाकुसर थेट कोणार्कच्या सूर्य मंदिराशी मिळतीजुळती असलेली आढळून येते. भगवान विष्णूंच्या दैत्य सुदन अवतारला समर्पित असलेले हे मंदिर बघण्यासाठी पर्यटकांची नियमित वर्दळ असते.

सलग पाच दिवस

या मंदिरामध्ये १६ मे पासून सलग पाच दिवस किरणोत्सव अनुभवायला मिळणार आहे. पुढील पाच दिवसात दुपारी साडेअकरा ते एकच्या दरम्यान सूर्यकिरण भगवान दैत्य सुदन यांच्या मूर्तीला अभिषेक करताना दिसून येणार आहेत. हा प्राचीन स्थापत्य व खगोल शाश्त्रीय चमत्कार बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांची गर्दी सुद्धा होण्याची होणार आहे. लोणार शहरातीलच रवी जावळे यांच्या परिवाराकडून येणाऱ्या सर्व भक्तांसाठी लाडवांचा प्रसाद तयार करण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाकडून हा किरणोत्सव बघण्यासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी तसेच भक्तांना उन्हापासून बचावासाठी योग्य व्यवस्था त्या ठिकाणी करावी अशी रास्त अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहेत. या किरणोत्सवामुळे लोणार शहरामध्ये पर्यटकांची वर्दळ वाढणार असल्याने पर्यटनाला चालना मिळण्याचे सुखद चित्र आहे.आतापर्यंत प्रसिद्धीपासून दूर असलेला हा किरणोत्सव मागील दोन-तीन वर्षांपासून मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे, हा किरणोत्सव अनुभवण्याची संधी उद्यापासून मिळणार असल्याने शहरातील स्थानिक नागरिक असो किंवा भाविक असो सर्वांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांनी शांतता ठेवून स्वतः ही दर्शन घेऊन इतरांना सुद्धा दर्शनाची संधी द्यावी व शांतता ठेवावी. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. -निमिष मेहत्रे, पोलीस निरीक्षक, लोणार