बुलढाणा: मागील अकरा दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील दाभाडी दरोड्याच्या तपासाचा धक्कादायक निष्कर्ष निघालाय! हा दरोडा बायकोच्या विश्वासावरील दरोडा, नातेसंबधावरील दरोडा निघाला आहे. अनैतिक संबंधापायी डॉक्टर असलेल्या नराधम पतीने अगोदर पत्नीची हत्या केली, नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात दरोड्याचा ‘देखावा’ तयार केला आणि स्वतःही गुंगीच्या गोळ्या घेत जखमी झाल्याचं सोंग वठविले. मात्र गुन्हेगार अट्टल असला तरी काहीनाकाही चुका करतो, मग या कथित दरोड्यातील आरोपी तर साधा पशु वैदकीय चिकित्सक, तो खाकीची काय फसवणूक करणार? चाणाक्ष आणि अनुभवी पोलिसांनी ही बाब ओळखली.

यापूर्वी डॉक्टरच्या मोबाईलमधील नको ते क्लीपिंग, व्हिडीओमधून सर्व प्रकार उघडकीस आला होता. काल बुधवारी रात्री उशिरा बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉ. गजानन टेकाडे (४५) याला ठाण्यात आणले. त्याला पोलिसी हिसका दाखविताच डॉक्टर पोपटासारखा बोलायला लागला. गजानन याने आपणच बायको (माधुरी टेकाडे) हिची अगोदर भरपूर झोपेच्या गोळ्या औषधीतून पाजून नंतर तिची उशीने नाक तोंड दाबून हत्या केल्याचे या पांढरपेक्षा आरोपीने कबूल केले. पत्नीच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या युवतीसोबत अनेक वर्षांपासून असलेल्या अनैतिक संबंधातून आपण हे कृत्य केल्याचे टेकाडे याने सांगितले. यानंतर त्याने बोराखेडी पोलिसांना आपण केलेल्या खऱ्याखुऱ्या हत्येची आणि बनावट दरोड्याची हकीकत तपशीलवार पणे सांगितली. प्रकरणी आरोपी विरुद्ध हत्या करण्याच्या कारणसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मोताळा तालुक्यात नव्याने खळबळ उडाली. बोराखेडी पोलिसांनी आरोपी डॉक्टर गजानन टेकाडे याला अटक केली आहे.

कानून के हाथ…

दाभाडी प्रकरण म्हणजे दरोडा असल्याचा बनाव करण्याचा आरोपी डॉक्टरने आटोकाट प्रयत्न केला. एवढेच काय जळगाव खान्देश येथे उपचार घेताना शुद्धीवर आल्यावरसुद्धा त्याने पोलिसांना जबाब देण्यास टाळाटाळ केली. मात्र आरोपीच्या नकारमागील कारण, बोराखेडी पोलिसांनी अचूक हेरले. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने हा दरोडा नव्हे तर ‘अगदी वेगळा प्रकार आहे’ हे ओळखले. यामुळे दरोड्याच्या संथ तपासावरून होणाऱ्या टीकेकडेदेखील दुर्लक्ष केले. तसेच शांत चित्ताने आणि संयम ठेवत तपास पूर्ण केला. यापरिणामी ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है’ हे नव्याने सिद्ध झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल बुधवारी रुग्णालयातून सुट्टी होताच रात्री बोराखेडी पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत बोरखेडी पोलीस ठाण्यात आणले. त्याला ‘बाजीराव दाखविताच’ टेकाडे याने भडाभडा आपल्या पापाचा घडा वाचला. २९ जानेवारीला डॉ. गजानन टेकाडे याचे घरात दरोडा पडल्याचे वरकरणी दिसून आले. मात्र ते सुनियोजित हत्याकांड असल्याचे सिद्ध झाले.