बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे खासदार प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. रविवारी संध्याकाळी ते मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे बुलढाणा जिल्ह्याला तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले जाधव यांनी सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. निकालानंतर मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यावर खासदार जाधव दिल्लीत दाखल झाले आहे. मंत्रीपदासाठी त्यांच्याशिवाय अनेक नावे स्पर्धेत होती. मात्र ज्येष्ठता, सलग चार विजय, राज्यात मंत्री पदाचा अनुभव, मागील कार्यकाळात केंद्रीय ग्रामविकास समिती आणि माहिती तंत्रज्ञान या दोन समित्यांच्या अध्यक्षपदाची संभाळलेली धुरा, दिल्ली दरबार राजकारणाचा अभ्यास, वरिष्ठ भाजपा नेत्यांशी असलेले संबंध आदी घटकामुळे त्यांचे पारडे जड ठरले. शिवसेनेतील बंडखोरीत त्यांनी एकनाथ शिंदेंना पाठबळ, खासदारांची केलेली जुळवाजुळव , यंदाच्या लोकसभा लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केलेला पराभव हे घटक देखील पूरक ठरल्याचे मानले जात आहे. यामुळे शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री पदासाठी खासदार जाधव यांच्या नावाची शिफारस केली.

हेही वाचा…PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : राष्ट्रवादीला नकार, पण केवळ एक खासदार असलेल्या जीतन मांझींना कॅबिनेट मंत्रीपद

जिल्ह्याची मंत्रिपदाची ‘हॅट्रिक’, पण…!

दरम्यान खासदार जाधव यांच्या रूपाने जिल्ह्याची केंद्रीय मंत्री पदाची राजकीय हॅट्रिक साधली जाणार आहे. यापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन युवा नेते खासदार मुकुल वासनिक यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथमच केंद्राचा लालदिवा मिळाला होता.पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मुकुल वासनिक यांना क्रीडा युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले होते. मूळचे नागपूरकर असलेले वासनिक यांनी १९८४ मध्ये बुलढाण्यातून निवडणूक लढवून खासदारकी मिळविली. १९८९ च्या लढतीत दारुण पराभव झाल्यावर १९९१ मध्ये पुन्हा बाजी मारली. त्यानंतर त्यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. २००९ मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ खुला झाल्याने त्यांनी रामटेक मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या मंत्री मंडळात त्यांना सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले होते.

दरम्यान १९९६ च्या लढतीत वासनिकांचा पराभव करून कामगार नेते आनंदराव अडसूळ हे प्रथमतः बुलढाण्याचे खासदार झाले. १९९८ मध्ये पराभूत झाल्यावर १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळविला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्री मंडळात त्यांच्यावर अर्थ नियोजन खात्याच्या राज्यमंत्री पदाची जवाबदारी सोपविण्यात आली होती. आज खासदार जाधव यांच्या रूपाने जिल्ह्याला तिसऱ्यांदा संधी मिळाले आहे. मात्र वासनिक हे नागपूर आणि अडसूळ हे नागपूर-मुंबई चे असल्याने ते ‘बाहेरचे’ होते.त्या अर्थाने जिल्ह्याच्या भूमीपुत्राला केंद्रीय मंत्री पद मिळण्याची ही पहिली वेळ आहे.

हेही वाचा…रणजी स्पर्धेसाठी विदर्भ ‘ब’ समूहात, ‘या’ संघाशी होणार सामना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शपथ पूर्वीच जल्लोष

दरम्यान निकाल लागल्याबरोबर खासदार जाधव यांच्या संभाव्य केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा गल्ली ते दिल्ली सुरू झाली. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे हे स्पर्धेत होते. शनिवारी अचानक संदीपान भुमरे यांचे नाव पुढे आले.मात्र काल रात्री उशिरा बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव आघाडीवर आले, इतर नावे मागे पडली आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले रविवारी त्यांना पंतप्रधान कार्यालयातून संदेश आला. ही बातमी बुलढाण्यात येऊन धडकताच जिल्ह्यात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. त्यांच्या गृहक्षेत्रात अर्थात मेहकर विधानसभा मतदारसंघात या फटाक्यांचा आवाज जोरदार होता.