बुलढाणा : आपल्या प्रलंबीत मागणीची पूर्तता व्हावी यासाठी अन्यायग्रस्ताने आंदोलनाचा वा अन्य इशारा देणे ही सामान्य बाब आहे. याच धर्तीवर आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी तहसीलसमोर आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यास नायब तहसीलदाराने उद्धटपणाची वागणूक देत मुजोरीचा कळस गाठला!
‘नंतर कशाला, आत्ताच आत्मदहन कर, मी तुला पेट्रोल आणून देतो’ असं उद्धाम उत्तर दिल्याने आज खामगाव तहसील कार्यलयात एकच राडा झाला. यामुळे उदविग्न झालेल्या शेतकऱ्याने तहसीलच्या भिंतीवरून उडी मारण्याचा असफल प्रयत्न केला तर प्रकरण अंगलट आल्याचे लक्षात येताच ‘नायब’ ने कार्यलयातून पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर वादंगाची तीव्रता कमी झाली. मात्र शेतकऱ्याच्या मागणीचे आणि नायब तहसीलदार वरील कारवाईचे काय? मागणीची पूर्तता आणि कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही म्हणून गोविंदा सोपान महाले (रा. ज्ञानगंगापूर, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी आज गुरुवारी, १३ नोव्हेंबर रोजी खामगाव तहसील कार्यालयात गेले होते. शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा या मागणीवर दोन महिन्यात काहीच कारवाई झाली नाही.
इतर शेतकरी नाल्यातून शेतात जाऊ देत नाही. यामुळे शेतातील सोयाबीन, केळी पडून असल्याने नुकसान झाले. आपला उदरनिर्वाह शेतीवर असल्याने आत्महत्येची वेळ आली यामुळे मागणी लवकर पूर्ण करावी. अन्यथा सात दिवसांत खामगाव तहसील समोर आत्मदहन करण्याचा ईशारा त्याने निवेदनातून दिला.

शेतकऱ्याने ही बाब नायब तहसीलदार (महसूल)निखिल पाटील यांना सांगितली. यावर पाटील यांनी “सात दिवसाने का मरता मी पेट्रोल आणून देतो आताच मरा” असा अजब सल्ला दिला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले.
ही बाब कार्यालय परिसरात असलेल्या शिवसेना पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांना कळाली. नायब तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता? असा जाब विचारला. सामाजिक कार्यकर्त्यांचे समाधान न करता निखिल पाटील नामक या नायब तहसीलदाराने तहसील कार्यालयातून पळ काढला.
या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या कानावर टाकण्यात आली. त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याच म्हटलं. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत वागणे अयोग्य असल्याचं म्हणत या प्रकरणात चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले.
