बुलढाणा: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे देखील चांगभलं झाले आहे.

नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या. २३ नोव्हेंबरला निकाल लागला. सात मतदारसंघात तब्बल ११५ उमेदवार रिंगणात होते. यातील सात भाग्यवान उमेदवार विजयी अर्थात आमदार झाले. उर्वरित १०८ उमेदवारांचा ‘निकाल’ लागला. आता या सात जणांचं चांगभलं झालं ते मान्य पण एसटी महामंडळाचे चांगभलं कसे असा प्रश्न उपस्थित होतो. तर त्याचे झाले असे की, महामंडळाच्या बुलढाणा विभागाने विधानसभा लढतीनिमित्त वीस तीस लाख नव्हे तर सुमारे पाऊण कोटी रुपयांचे घसघशीत उत्पन्न मिळविले. विधानसभेमुळे बुलढाणा विभागाला ७२ लाख ८३ हजार रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले.

हेही वाचा – मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…

हेही वाचा – सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मतदान केंद्रांवर मतदानासाठी नियुक्त हजारो अधिकारी, कर्मचारी आणि मतदान साहित्य याची मतदान केंद्रावर येजा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने बुलढाणा विभागाच्या २६८ बसगाड्या भाडे तत्वावर घेतल्या होत्या. साहित्य आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावर आणि केंद्रावरून ‘स्ट्रॉंग रूम’पर्यंत वाहतूक करण्यासाठी लालपरीचा वापर करण्यात आला. यातून बुलढाणा विभागाला ६५.१४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच पोलीस विभागाने बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी वाहतूक करण्यासाठी २१ बस भाड्याने घेतल्या होत्या. याद्वारे वेळोवेळी पोलीस कर्मचारी वाहतूक करण्यात आली. यातून महामंडळाला ७ लाख ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे विधानसभा निवडणुकीमुळे बुलढाणा विभागाला ७३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.