बुलढाणा : बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात दिमाखदार वाघ, ज्ञानगंगामध्ये बिबट्यासह विविध वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. यामुळे वन्यजीव कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमी सुखावले. पण, ढगाळ वातावरणामुळे अनेक प्राणी पाणवठ्याकडे फिरकले नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड देखील झाला. यंदाची प्राणी गणना वा निसर्ग अनुभव काहीसा संमिश्र स्वरूपाचा ठरला.

सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या अंबाबरवामध्ये १२ मे व १३ मे रोजी सकाळी ९ पर्यंत वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या प्राणी गणनेमध्ये २ वाघ, ३ बिबटसह अस्वल, मोर अशा विविध ४६१ वन्यप्राण्यांचे पर्यटकांना दर्शन झाले आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे यांच्यासह वन कर्मचारी वन्यजीव विभाग आधीपासूनच सज्ज झाला होता. गणनेकरिता ५ वनक्षेत्रपाल १९ वनरक्षक व ५० वनमजुरांची नेमणूक करण्यात आली होती. संग्रामपुर तालुक्यात येणारे अंबाबरवा अभयारण्य १५ हजार ८३९. ७५ हेक्टर क्षेत्रफळावर विस्तारलेले आहे.

निर्सग अनुभव कार्यक्रमासाठी अंबाबरवा अभयाण्यात नैसर्गिक ७ व कृत्रिम २४ असे एकूण ३१ पाणवठे तयार करण्यात आले होते. या स्थळावर वन्यप्राणी गणनेकरीता २७ मचाण उभारण्यात आले होते. मचाणावरून वन्यप्राणी प्रेमीच्या उपस्थितीत गणना करण्यात आली.

वन्य प्राण्यांची संख्या

अंबाबरवा अभयारण्यात वाघ २, बिबट ३, अस्वल ७, नीलगाय २८, सांबर ३९, भेडकी १०, गवा ३१,रान डूक्कर २४, लंगुर ३०, माकड १६३, मसन्या उद १४,रान कोंबडी ३०, रान मांजर १०, मोर ५५, ससे ३, चांदी अस्वल २, मुंगस ५, सायाळ ४, साप १ असे एकूण ४६१ वन्य प्राण्यांचे पर्यटकांना दर्शन झाले.

ज्ञानगंगात वन्यप्राणी गणना

बुलढाणा खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वन प्राण्यांची १७ मचाणे उभारून गणना करण्यात आली. सोमवारी सायंकाळी ४ ते मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत निसर्गप्रेमी बरोबरच वनविभाग कर्मच्याऱ्यांनी वन्यप्राणी गणना केली. माहितीनुसार ज्ञानगंगात अभयारण्यात ११ बिबट,२५ अस्वल,१८० रानडुक्कर,८ सायाळ,३३ ससे,६ तडस,१६ भेडकी,६९ नीलगाय,११५ मोर-लांडोर,२ चिंकारा,९ हरीण,१ खवलेमांजर,१० रानमांजर,४ मुंगुस,३८ माकड असे प्राणी आढळले.