बुलढाणा : येत्या एक मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ‘काळा दिवस’ पाळण्यात येणार आहे. या दिवशी विदर्भातील सर्व जिल्ह्यात व तालुकस्थळी धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सर्वेसर्वा ॲड. वामनराव चटप यांनी इथे ही माहिती दिली. तसेच आंदोलनाच्या विस्तारसाठी आणि व्यापक जनजागृतीच्या उद्देशाने येत्या २५ मे रोजी अमरावती येथे पश्चिम विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दीर्घ संघर्ष करणारे ॲड. वामनराव चटप यांनी बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील घोषणावजा माहिती दिली. याप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष रंजना मामर्डे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राम बारोटे, जिल्हा समन्वयक दामोदर शर्मा, तेजराव मुंडे, युवा आघाडीचे शरद पोफळे, सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंगणे, उपाध्यक्ष सिद्धार्थ हिवाळे, सुखदेव नरोटे, ॲड. सुभाष वीणकर, प्रकाश घुबे, प्रा. अनिल रिंढे, प्रा. पी आर राजपूत उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड. वामनराव चटप यांनी विदर्भ राज्य, नागपूर करार, संयुक्त महाराष्ट्र, विदर्भाचे झालेले सर्वकश नुकसान, याचा धावता आढावा घेतला. समितीच्या आंदोलनाला जनाधार नसल्याचा अरोप फेटाळून लावतानाच तीव्र आंदोलनाची फारसी आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद ॲड. वामनराव चटप यांनी केला. स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे तेलंगणा सोडले तर अलीकडंच्या काळातील छत्तीसगड, उत्तराखंड, आदि नवनिर्मित राज्यासाठी आंदोलने झाली नाहीत. त्यासाठी कुणी मागणीही केली नाही. मात्र मोठा विस्तार लक्षात घेऊन जनतेच्या सुविधेसाठी, अविकसित भागाचा विकास करण्यासाठी राज्य निर्मिती करण्यात आली. सरकारने ठरवलं तर राज्य निर्मिती सहज शक्य आहे, असे ॲड. वामनराव चटप म्हणाले.
भाजपाने आश्वासने दिली, ठराव घेतला; पण सत्तेत आल्यानंतर…
विदर्भ राज्याच्या निर्मितीचे आश्वासने देऊन, ठराव घेऊन सत्तेत आलेल्या भाजपाने नंतर विदर्भ राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस व शरद पवार यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशीच राहिली. शिवसेना व मनसेने उघड विरोध दर्शविला, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले. येत्या २५ मे रोजी अमरावती येथील अभियंता भवन येथे पश्चिम विदर्भ मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मेळाव्यासाठी सरपंच, विना अनुदानित शाळांचे शिक्षक यांना निमंत्रित करण्यात आल्याचे ॲड. वामनराव चटप यावेळी म्हणाले.
‘राजकारणामुळे विदर्भाचे वाटोळे’
मेळाव्यात विनाअनुदानित शाळांचे शिक्षक, कंत्राटी व तासिकावरील शिक्षक यांना निमंत्रित करण्यात आल्याचे डॉ. राजपूत यांनी सांगितले. रंजना मामर्डे यांनी राजकारणामुळे विदर्भाचे वाटोळे झाल्याचे विविध आकडेवारींसह स्पष्ट केले. सिंचन, नोकऱ्यांचा अनुशेष आणि विदर्भाची खुंटलेली प्रगती हे संयुक्त राज्यामुळे झाले. विदर्भ राज्य झाले असते तर या राज्याने चौफेर प्रगती केली असती, असे रंजना मामर्डे म्हणाल्या.