लोकसत्ता टीम

अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून वंचितच्या युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे बुधवारी रात्री दहन केले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडून अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राज्यसभेत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राजकीय वादात अडकले आहेत. विरोधकांनी शहांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘माझ्या विधानांची तोडमोड करून काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे’, असा आरोप अमित शहांनी केला.

आणखी वाचा-आदित्य ठाकरेंनी कोणत्या काँग्रेस आमदाराच्या बरखास्तीची मागणी केली?

मात्र, ‘शहांनी आंबेडकरांचा अपमान केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहांचा राजीनामा घेतला नाही तर देशभर तीव्र आंदोलन केले जाईल’, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. अमित शहांच्या विधानावरून संपूर्ण देशात राजकीय वाद पेटला. विविध ठिकाणावरून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या वादात आता वंचित बहुजन आघाडीने देखील उडी घेतली असून अमित शहा यांना लक्ष्य केले.

वंचितच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमित शहांचा अकोल्यात पुतळा जाळला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यसभेत अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत त्यांचा अवमान केल्याचा आरोप वंचित आघाडीने केला. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावरील मिराज सिनेमाजवळ अमित शहा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी विविध घोषणाबाजी करून अमित शहांचा निषेध करण्यात आला.

आणखी वाचा-एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र हातात घेत राष्ट्रीय महामार्गावर कार्यकर्त्यांनी चक्का जाम आंदोलन देखील केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे घरे फोडली जातील, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने देण्यात आला. यावेळी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, रितेश यादव, सचिन शिराळे, मिलिंद दामोदर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.