लोकसत्ता टीम

नागपूर: वाहन चालवताना मोबाईलवर बोलने गुन्हा आहे. परंतु एसटी महामंडळाच्या बाजार गाव ते नागपूर धावणाऱ्या बस चालकाने बस चालवतानाच मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. एका प्रवाशाने याची चित्रफीत तयार केल्यावर हा प्रकार पुढे आला.

गोपाल (बदललेले नाव) असे प्रवाशाचे नाव आहे. तो नागपूरचा रहिवासी आहे. गोपाल हा ३१ मार्चला बाजारगाव येथून एसटीच्या बस क्रमांक ७६०६मध्ये बसला. ही बस वर्धमाननगर डेपोची होती. प्रवासादरम्यान बस चालकाने हेडफोन कानात टाकून संवाद सुरू केला. एका प्रवाशाने त्याची चित्रफीत बनवली. या चित्रफीतसह त्याने महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली. सोबत या बसचे तिकीटही जोडले. लोकसत्ताने या विषयावर एसटीच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने चौकशी करून योग्य कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.