गडचिरोली : घनदाट जंगलातल्या पायवाटा, अंधाऱ्या रात्री, नक्षल्यांची दहशत, सतत गोळ्यांचा आवाज… या वातावरणात गेली २६ वर्षं झुंज देणारा सी-६० कमांडर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी गडचिरोलीच्या मातीतला हा शौर्यपुत्र आज संपूर्ण गडचिरोली पोलीस दल आणि गडचिरोलीकरांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. कोपर्शी चकमकीत त्यांनी कारकिर्दीतील शंभरावा नक्षलवादी ठार केला. गुरुवारी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी त्यांच्या या अद्वितीय पराक्रमाचा गौरव केला.
१० नोव्हेंबर १९७६ रोजी जन्मलेले वासुदेव मडावी हे अत्यंत गरीब कुटुंबातून येतात. १९९८ मध्ये पोलीस शिपाई म्हणून रुजू झालेला हा तरुण, जंगलातल्या पहिल्या मोहिमेतच सहकाऱ्यांच्या नजरेत भरला. शौर्य, संयम आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर वासुदेव मडावी यांनी पायरीपायरीने पुढे जात अखेर पोलीस उपनिरीक्षकपदापर्यंत झेप घेतली. त्यांना या प्रवासात तीन वेगवर्धित पदोन्नती मिळाल्या. आज ते सी-६० पथकाचे धाडसी पार्टी कमांडर म्हणून ओळखले जातात.
नक्षल्यांविरोधात धाडसी कामगिरी
वासुदेव मडावी यांच्या नावावर आजपर्यंतच्या ५८ चकमकींची नोंद आहे. बोरीया–कसनासूरच्या चकमकीत त्यांनी ४० नक्षलवादी ठार केले. मर्दिनटोला येथे २७, गोविंदगावात ६, तर कोपर्शी-कोढूर व कतरंगट्टा येथे आणखी ८ नक्षल ठार केले. काल झालेल्या कोपर्शी चकमकीत ४ जहाल माओवादी ठार करत त्यांनी १०१ आकडा गाठत शंभरी पार केली. एवढेच नव्हे तर ५ माओवाद्यांना जिवंत पकडण्याचे श्रेयही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या शौर्यासाठी राष्ट्रपतींकडून पोलीस शौर्य पदक, असाधारण आसूचना कुशलता पदक तसेच पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह अशा मानचिन्हांनी त्यांना गौरविण्यात आले.
अजून दोन शौर्यपदकांसाठी त्यांची नावे प्रस्तावित आहेत. नक्षलविरोधी लढ्यात शौर्य गाजवत धैर्य दाखवणारा हा अधिकारी आज सहकाऱ्यांसाठी प्रेरणा ठरला आहे. वासुदेव मडावी यांचा प्रवास केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही. जंगलातल्या एका गावकऱ्याचा मुलगा शांततेसाठी शस्त्र उचलतो आणि स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता लढतो, हीच त्यांची ओळख आहे. प्रत्येक चकमकीनंतर त्यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक म्हणजे ‘कर्तव्य पूर्ण केल्याचा’ अभिमान, तर प्रत्येक सहकाऱ्याच्या डोळ्यांत त्यांच्याबद्दलचा आदर आहे. गुरुवारी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते झालेल्या समारंभात मडावी यांचा सत्कार झाला. हॉलमधील टाळ्यांचा गजर, सहकाऱ्यांची उभी राहून केलेली दाद मडावींच्या २६ वर्षांच्या प्रवासाला मुकुट घालणारे ठरले.