अमरावती : भारत-पाकिस्तान संघर्ष उफाळून आलेला असताना तुर्कीयेने (तुर्कस्तान) पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्कीयेवर बहिष्कार घालण्याची मागणी जनतेमध्ये वाढत आहे, ‘बॉयकॉट तुर्किये’ या नावाने ही मोहिम सुरू झाली आहे, ज्यामध्ये तुर्कीयेमधून येणाऱ्या वस्तू, पर्यटन आणि इतर व्यवहारांवर बहिष्कार टाकायला सांगितले जात आहे. आता कापूस व्यापार देखील थांबवण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) घेतला आहे.
तुर्किए भारतातून कापूस आणि इतर साहित्य आयात करते. २०२४ मध्ये, तुर्किएने भारतातून कापसासह एकूण ७४.२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आयात केली होती, तर त्याच कालावधीत भारतातून निर्यात २.८४ अब्ज अमेरिकन डॉलर्सची झाली. जगातील सर्व देश त्यांचे व्यावसायिक भागीदार निवडताना स्वतःच्या हिताला प्राधान्य देतात.
म्हणूनच, अलिकडच्या भू-राजकीय घडामोडी आणि तुर्कीच्या भारतविरोधी धोरणांना लक्षात घेऊन, तुर्कीयेसोबतचा सर्व कापूस व्यापार थांबवण्याचा विचार करावा आणि आमच्या राष्ट्राच्या हितासाठी आणि मजबूत आणि स्वावलंबी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यायी पर्यायांचा शोध घ्यावा, असे आवाहन ‘सीएआय’चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी पत्राद्वारे केले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान, तुर्कीयेने भारतविरोधी भूमिका दाखवली आहे आणि भारताविरुद्ध उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तुर्कीयेने पाकिस्तानला ड्रोन, इतर शस्त्रे आणि त्यांचे कार्यकर्ते पुरवून भारतीय नागरिक आणि लष्करी प्रतिष्ठानांवर अलिकडच्या हल्ल्यात मदत केली आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिले आहे. यापूर्वीही, अनेक प्रसंगी, तुर्कीये यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि आपल्या राष्ट्रीय हितांविरुद्ध काम केले आहे. तुर्कीये देशाच्या या कृती आपल्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या आणि अखंडतेच्या विरोधात आहेत. म्हणूनच ‘सीएआय’ने या देशासोबत कापूस व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे अतुल गणात्रा यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे तुर्कीयेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
‘बॉयकॉट तुर्कीये’ या मोहिमेला आता वेग आला आहे. तुर्कीयेतून भारतात येणाऱ्या वस्तू तसेच फळांवरही बहिष्कार घालण्यात आला आहे. देशभरातील फळ व्यापाऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. सुकामेवा व्यापाऱ्यांनीदेखील तुर्कस्तानमधून येणाऱ्या सुक्यामेव्यावर बहिष्कार घातला आहे. संपूर्ण देशात तुर्कीयेच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. साधारणे पुण्यात दरवर्षी शंभर कोटीहून अधिक किमतीच्या सुक्यामेव्याची पुण्यात आयात केली जाते. सुकामेव्याच्या व्यापाऱ्यांकडून टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे तुर्कस्तानवर मोठा आर्थिक परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.