नागपूर : महावितरणच्या थकबाकीदारांविरोधातील मोहिमेचा गैरफायदा घेत काही महाठगांनी सर्वसामान्यांना लुटण्याची नवीन युक्ती शोधली आहे.  ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर रात्री- बेरात्री  वीज खंडित करण्याचा संदेश येतो. लगेच थकित देयक भरायला सांगितले जाते. ग्राहकाने प्रतिसाद देताच एक लिंक येते. त्यावर पैसे भरताच ते या भामट्यांच्या खात्यात जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात  महावितरण आर्थिक कोंडीत सापडली आहे. त्यामुळे  वीज देयक वसुली मोहीम राज्यभर जोरात सुरू आहे. याचा गैरफायदा काही महाठग घेत आहेत. त्यातूनच थकबाकीदार ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर रात्री- बेरात्री  खोटे संदेश पाठवले जातात. त्यात  देयक त्वरित न भरल्यास  रात्री ९ ते १० दरम्यान वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. रात्रीच वीज खंडित होण्याच्या भीतीपोटी काही ग्राहक नोटिफिकेशनवरील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात. हा क्रमांक महाराष्ट्राच्या बाहेरचा असतो. परंतु, तो येथीलच असल्याचे भासवले जाते. त्यानंतर  लिंक पाठवून त्यावर पैसे टाकण्यास सांगण्यात येते. रक्कम  खात्यात आल्यास हे महाठग पसार होतात. ही रक्कम महावितरणकडे जात नसल्याने ग्राहकांची देयकाची थकबाकी मात्र तशीच कायम राहते.  हा धक्कादायक प्रकार घडत असतानाही महावितरणकडून अद्याप कठोर पावले उचलण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘‘महावितरणकडून कधीच रात्री- बेरात्री ग्राहकांना संदेश पाठवून वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत नाही. त्यामुळे अशा संदेशाला ग्राहकांनी प्रतिसाद देऊ नये. सोबत महावितरणच्या अधिकृत देयक भरणा केंद्रासह संकेतस्थळ वा अॅेपच्या मदतीनेच देयकाचा भरणा करावा.’’

– अनिल कांबळे,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

‘‘महावितरणचे ग्राहक असलेले सिंहगड रोड, पुणे येथील अॅवड. संदीप सावंत यांना रात्री भ्रमणध्वनीवर या पद्धतीचा संदेश आला. परिचित असल्याने त्यांनी मला माहिती दिली. घटनेचे गांभीर्य बघत सजग कर्मचारी म्हणून वरिष्ठांना माहिती दिली. ग्राहकांनीही अशा संदेशांना प्रतिसाद देऊ नये.’’

– नीलेश खरात, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camouflage rob power consumers ysh
First published on: 20-01-2022 at 00:02 IST