नागपूर : एका कौटुंबिक सोहळ्यासाठी नातेवाईकांच्या घरी कारने निघालेल्या एका जोडप्यांसोबत मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना होता होता वाचली. दैव बलवत्तर होते म्हणून हे दोघेही सुखरूप आहेत. नातेवाईकांकडे निघालेल्या या जोडप्यांच्या कारमधून सकाळी सकाळी रस्त्यातच धूराचे लोट निघू लागले. कारच्या समोरील भागातल्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे पाहून कार चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या बाजूला घेतली.

बॉनेट उघडून पहाताच कारच्या इंजिनने पेट घेतल्याचे दिसले. त्यामुळे कारमधल्या व्यक्ती तडक बाहेर पडल्या. शहराचा अगदी मध्यवर्ती भाग असलेल्या धरमपेठेत ही दुर्घटना होता होता वाचली. टिळक नगरातील विधी महाविद्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वेस्ट हायकोर्ट रोडवर पेट्रोलपंपाला लागून नव्याने सुरू झालेल्या एका कपड्यांच्या शोरूम समोर हा थरारक प्रसंग घडला. वाहनांनी कायम गजबजलेला रस्ता म्हणून वेस्ट हायकोर्ट रोड ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात खासगी शिकवण्यांचीही संख्या आहे. त्यामुळे नोकरदारांसोबतच विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावर कायम वर्दळ असते.

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच इमारतीत फिटजी नावाच्या शिकवणी वर्गाचेही कार्यालय आहे. तिथेच विद्यार्थी मोठ्या संख्येने शिकवणीसाठी येतात. मात्र सुदैवाने ज्या वेळी ही दुर्घटना होता होता वाचली ती सकाळची वेळ असल्याने रस्त्यांवर वर्दळ कमी होती. शिवाय सकाळच्या वेळेमुळे शिकवणी वर्गातही फारसे विद्यार्थी नव्हते. त्यामुळे रस्त्यांवर गर्दीच कमी असल्याने कोणतीही भिष दुर्घटना टळली. परिसरातील काही नागरिकांनी लगेच पाणी आणि अग्निशमक यंत्रातल्या द्रवाचा शिडकाव करत कारला लागलेली आग विझवली.

कार चालकाने लगेच थोड्या वेळेत टोईंग वाहनाला बोलवत पेटलेली कार उचलूनही नेली. दुपार पर्यंत अंबाझरी वा सिताबर्डी अशा दोन्ही पोलीस ठाण्यांपैकी कुठेही कारने पेट घेतल्याने नुकसान झाल्याची तक्रार आलेली नव्हती. त्यामुळे पेटलेली ही कार नेमकी कोणाची होती, याचा तपशील मात्र मिळू शकला नाही. मात्र तोवर कोणीतही या प्रसंगाचे चित्रिकरण करीत ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. त्यामुळे नेमके घडले काय हे अद्याप समजू शकले नाही.