बुलढाणा : अपघात बरोबरच गुन्हेगारी घटनांसाठी अधून मधून गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर संभाव्य दरोडा टळला आहे. याचे कारण पोलिसांनी दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून दरोड्याचे साहित्य, चारचाकी वाहन आणि शस्त्रे जप्त केली आहे.

लोणार तालुक्यातील बीबी पोलिसांनी दरोडेखोरांचा सिने स्टाईल पाठलाग करून जालना जिल्हा हद्दीमधून त्यांना जेरबंद केले. मात्र, दोघे जण अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात सफल ठरले आहे. समृद्धी द्रुतगती महामार्गावर काल रात्री हा थरार घडला. बिबी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर रात्री १ वाजताच्या सुमारास चैनल नंबर ३०६ जवळ ही घटना घडली. यावेळी बीबी पोलीस ठाण्याच्या ‘पेट्रोलिंग’ चमुला उभ्या असलेल्या ट्रक समोर कार (क्रमांक एमएच ०१ बिजी ८९६६ महींद्रा एक्स युव्ही) थांबून त्यातील चार लोक रस्त्यावरील उभे असल्याचे दिसून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत दोघांनी पळ काढला.

हेही वाचा : अमरावती: दोन कार समोरासमोर धडकल्या; तीन युवक ठार, तीन जखमी

पोलिसांचे वाहन दिसताच दोघांनी वाहनाने पळ काढला. संशय बळवल्याने बीबी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. बीबी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत जालना हद्दीतून दोन आरोपीना ताब्यात घेतले. या दोन आरोपींकडून महिंद्रा एक्सयुव्ही५०० कारसह दोन धारदार चाकु, रॉड, दोरखंड, गुंगीचे स्प्रे व इतर दरोडा टाकण्याकरीता बाळगलेले साहीत्य असा ७ लाख ५० हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

वेगाने पळ काढणाऱ्या वाहनाने बुलढाणा जिल्हा हद्द ओलांडून जालना जिल्हा सीमेत प्रवेश केला. मात्र, बीबी पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवून अंबड रोड जालना येथे वाहन पकडले. दरम्यान कार क्रमांक एमएच ०१ बिजी ८९६६ सह दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.

यावेळी आरोपींची कसून चौकशी केली असता वाहनात दोन धारदार चाकू, रॉड, लोखंडी पाईप, मिरची पूड, दोरखंड, स्प्रे व इतर वस्तू दरोडा टाकण्याकरिता बाळगलेले साहित्य मिळून आले. आरोपींनी ते साथीदारांसह समृद्धी महामार्गावर उभ्या राहत असलेल्या वाहनावर दरोडा टाकून लूटमार करण्याचे उद्देशाने आले होते. मात्र पोलीस आल्याने पळ काढण्याची कबुली दिली व इतर फरार साथीदार आरोपींची नावे देखील सांगितली. यावरून बीबी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता नुसार कलम ३१०(४) सह कलम ४,२५ शस्त्र अधिनियम अन्वये दरोड्याची पूर्वतयारी बाबतचा गुन्हा नोंद केला. अभिषेक उर्फ रावण प्रताप गवारे (वय २२ वर्षे राहणार साडेसावंगी,तालुका अंबड, जिल्हा जालना व रंगनाथ बाजीराव डबडे (वय २५ वर्षे राहणार चांभारवाडा, तालुका अंबड जिल्हा जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील इतर आरोपींचा बीबी पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

हेही वाचा : यवतमाळ : पतंगीचा जीवघेणा खेळ! नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अट्टल गुन्हेगार

बीबी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या सतर्क पेट्रोलिंग मुळे व जालनापर्यंत पाठलाग करून आरोपींना पकडल्याने मोठी घटना होण्यापासून टळली आहे. गुन्ह्यात समाविष्ट असलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी देखील जबरी चोरी डिझेल चोरी, स्टेपनी चोरी यासारखे बरेच गुन्हे दाखल आहे. पुढील पोलीस तपासात अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कामगिरी पोलीस उपाधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, अशोक थोरात, मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस अंमलदार परमेश्वर शिंदे, अरुण सानप, रवी बोरे यांनी केली आहे.