नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमीचा उत्सव गुरुवार, २ ऑक्टोबरला रेशीमबाग मैदानावर साजरा होणार आहे. अर्धशतकाहून अधिक कालखंडापासून संघात जाणाऱ्यांपासून आताच्या पिढीतील तरुणांपर्यंत काही हजार स्वयंसेवक शहरातील या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाचे साक्षीदार होणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० वाजता या संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवाला सुरुवात होणार असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या ऐतिहासिक उत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी मार्गदर्शन करणार असून संपूर्ण देशाचे त्यांच्या भाषणाकडे लक्ष आहे.

विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा राहणार आहे. या उत्सवात देशातील आणि देशाबाहेरील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, घाना यांसारख्या देशांचे प्रतिनिधींचा समावेश आहे. त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच उद्योग, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावर्षीच्या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. संघाने आंतरराष्ट्रीय दुतावासांनाही सोहळ्याचे निमंत्रण दिले असून त्यांची उपस्थिती राहणार आहे.

देशभरात कार्यक्रमांचे आयोजन

नागपूरमध्ये शताब्दी वर्ष सोहळा साजरा होणार असून येथे प्रत्येकाला उपस्थित राहणे अशक्य आहे. त्यामुळे यावर्षी नागपूरसह देशभरात संघाच्या शाखा असणाऱ्या विविध भागांमध्येही शताब्दी सोहळा साजरा होणार आहे. तसेच, विविध शहरांमध्ये पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या भागात पथसंचलन करून शताब्दी सोहळा साजरा करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सरसंघचालक कोणत्या मुद्यांना स्पर्श करणार

सरसंघचालकाचे या कार्यक्रमात होणारे भाषण हे संघाची पुढील दिशा ठरवणारे असते. तसेच यातून स्वयंसेवकांनाही संदेश दिला जातो. यंदाचा विजयादशमी उत्सव विशेष असल्याने सरसंघचालक डॉ. भागवत कोणत्या मुद्यांना स्पर्श करतात, याकडे लक्ष राहणार आहे. संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करत असताना, ‘सामाजिक समरसता’ दर्शवत मोठ्या प्रमाणात तळागाळातील उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार देशभरात एक लाखाहून अधिक ‘हिंदू संमेलन’ आणि ‘घर घर संपर्क अभियान’ आयोजित करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे शताब्दी सोहळ्यात सरसंघचालक काय बोलणार हे महत्त्वाचे राहणार असून मोठ्या उपक्रमांच्या घोषणेची शक्यता आहे.