नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तिकीट खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एटीव्हीएम, युटीएस सिस्टीम आणि मोबाइल युटीएसनंतर आता मोबाइल यूटीएस सहाय्यक सेवा सुरु केली आहे. तिकीट खरेदीसाठी मोबाईल फोनचा अधिकाधिक वापर व्हावा म्हणून रेल्वेचा हा प्रयत्न आहे.
नव्या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून केवळ १३ दिवसांत तब्बल २०.३३ लाख रुपये उत्पन्न नोंदवण्यात आले आहे.
मोबाइल यूटीएस सहाय्यकांची रचना अत्यंत उपयुक्त आणि प्रवासी-केंद्री आहे. या सहाय्यकांना एक स्मार्टफोन आणि लहान तिकीट प्रिंटिंग मशीन दिलेले आहे, जे ते शरीरावर बांधून घेतात. हे सहाय्यक सीएसएमटी स्टेशनवरील कन्सकोर्स, होल्डिंग एरिया किंवा इतर परिसरात फिरून प्रवाशांकडून तिकीट भाडे स्वीकारतात आणि तत्काळ तिकीट जारी करतात. प्रवाशांना डिजिटल पेमेंट किंवा रोख रक्कम अशा दोन्ही पर्यायांचा वापर करता येतो. आवश्यकतेनुसार हे सहाय्यक तिकीट खिडक्यांच्या आत बसूनही तिकीट देऊ शकतात.
मोबाइल यूटीएस सहाय्यक सेवेला मिळालेला प्रतिसाद लक्षणीय आहे. ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १२,७३३ तिकीटांच्या विक्रीतून २०.३३ लाख रुपये एवढे उल्लेखनीय उत्पन्न मिळाले. ही सेवा केवळ सीएसएमटीपुरती मर्यादित नसून भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या शहरांतील प्रमुख स्थानकांवर-नवी दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नई-येथेही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील प्रवासी तिकीट खरेदीसाठी अधिक सुलभ आणि वेगवान पर्यायाचा लाभ घेऊ लागले आहेत.
मध्य रेल्वेने सदैव प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य दिले आहे. मोबाइल यूटीएस सहाय्यकांची ही नवी संकल्पना तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासोबतच गजबजलेल्या स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासही मदत करत आहे. विशेषत: तातडीच्या प्रवासामध्ये ही सेवा मोठी सोय ठरत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करत आहे की त्यांनी या आधुनिक आणि वेळ वाचवणाऱ्या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. मोबाइल यूटीएस सहाय्यकांमुळे पारंपरिक तिकीट खिडक्यांवरील ताण कमी होणार असून प्रवाशांच्या प्रवास अनुभवातही सकारात्मक सुधारणा होणार आहे. मध्य रेल्वेचा हा उपक्रम भविष्यात आणखी स्टेशनांवर विस्तारण्याची शक्यता असून, तिकीट सेवांमध्ये डिजिटल परिवर्तनाचा हा वेगवान टप्पा मानला जात आहे.
