चंद्रपूर : आगामी महापालिका निवडणुक बघता भाजपा महानगरच्या वतीने भूमिपूजन कार्यक्रमांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. तुकूम प्रभाग क्र.१ व्दारका नगरी येथे १.३३ कोटीच्या नाला व भूमिगत नाल्याच्या भूमिपूजनाचा सोहळा आज गुरूवार ३० ऑक्टोंबर रोजी आयोजित केला होता. या भूमिगत नाल्याचे बांधकाम झाले तर प्रभागातील ५०० लोकांची घरे पूराच्या पाण्याखाली येतील. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी या कामाला कडाडून विरोध केला.
आमदार किशोर जोरगेवार भूमिपूजनासाठी आले. मात्र प्रभागातील लोकांचा विरोध बघता दिवाळीच्या शुभेच्छा देत भूमिपूजन न करताच निघून जाण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. लोकांनी बंद पाडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याची राजकीय वर्तुळात घटनेची चर्चा आहे.
तुकूम येथील व्दारका नगरीला दरवर्षी पावसाळ्यात पूराचा फटका बसतो. या प्रभागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरते. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. महाजनको कंपनीने बांधलेल्या रेल्वे यार्डमुळे पावसाचे पाणी अडून ५०० घरात पाणी शिरत असल्याने आर्थिक नुकसान मोठे होते. तेव्हा रेल्वे यार्डमुळे अडणारे पाणी बाहेर निघावे अशी व्यवस्था करावी अशी मागणी व्दारका नगरी संघर्ष समितीने आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदन देवून केली आहे.
दरम्यान नगरोत्थानच्या निधीतून १.३३ कोटी रूपये मंजूर करून या व्दारका नगरी येथे भूमिगत नाला तसेच नाल्याचे काम मंजूर केले आहे. हा भूमिगत नाला व छोटा नाला झाला तर प्रभागातील ५०० पेक्षा अधिक घरांना पूराच्या पाण्याचा फटका बसेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर काम रदद करावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी तसेच महापालिकेकडे केली. मात्र भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रभागातील नागरिकांची मागणी लक्षात न घेता आज गुरूवार ३० ऑक्टोबर रोजी १.३३ कोटीच्या या भूमिगत नाल्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
राऊत लेआऊट, गुरूदेव सेवा मंडळ चौक येथे सायंकाळी पाच वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन आयोजिले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, प्रमख पाहुणे भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक जीवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर अनिल फुलझेले होते.
सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आमदार किशोर जोरगेवार भूमिपूजनासाठी कार्यक्रमस्थळी हजर झाले. मात्र प्रभागातील नागरिकांनी निषेधाच्या घोषणा देत भूमिपूजनाला कडाडून विरोध केला. लोकांचा विरोध बघता आमदार जोरगेवार अस्वस्थ झाले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी प्रभागातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांचा तीव्र विरोध बघता आमदार जोरगेवार यांनी एक पाऊल मागे घेत भूमिपूजन रद्द करित असल्याचे सांगितले. त्यानंतर भूमिपूजन सोहळ्याचे स्नेहमिलन कार्यक्रमात रूपांतर करून आमदार जोरगेवार यांनी प्रभागवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाची सांगता केली.
विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याची माहिती महापालिकेच्या अधिकारी वर्गाला नव्हती. यावेळी काॅग्रेसचे प्रशांत भारती यांनी मंचावरून प्रभागातील नागरिकांची भूमिका आणि भूमिपूजनाला विरोध असल्याची भूमिका मांडली.
