चंद्रपूर:भाजपचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी महानगराची कार्यकारिणी जाहीर करताच भाजप निष्ठावंतांच्या राजीनामा सत्राला सुरूवात झाली आहे. माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार यांनी शहर उपाध्यक्ष पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देतांना, सातत्याने पक्ष बदल करणाऱ्या दलबदलुंची व उपऱ्यांची कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती करणे आणि ३० ते ३५ वर्षापासून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय व अवहेलना होत असल्याची बाब महानगर भाजपची नविन कार्यकारिणी बघितली तर दिसून येते. हा निष्ठावंतांवर एक प्रकारे अन्याय आहे आणि दलबदलूंना बक्षिस दिले गेले आहे असा थेट आरोप अडपेवार यांनी केला आहे.
भाजपाचे चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष सुभाष कोसनगोट्टूवार यांनी रविवार ३ ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगर भाजपाची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत सातत्याने निष्ठा बदलणारे, ज्यांच्या निष्ठा नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिल्या आहेत अशांना तसेच यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सक्रिय असलेल्यांना, शिवसेनेतून भाजपवासी झालेल्यांना आणि विधानसभा निवडणुकीत केवळ उमेदवारीसाठी कॉग्रेसच्या मंचावर जावून पून्हा भाजपात दाखल झालेल्यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
काहींकडे महामंत्री तर काहींना उपाध्यक्ष पदाचे बक्षीस देण्यात आले आहे. काहींना सचिव तर काहींना निमंत्रीत सदस्य केले गेले आहे. वेळोवेळी निष्ठा बदलणाऱ्यांना पक्षाच्या कार्यकारिणतीत स्थान दिल्याने व्यथीत झालेले माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याची प्रत अडपेवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते हंसराज अहीर, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार यांना पाठविली आहे.
हा राजीनामा पाठवितांना अडपेवार यांनी अनेक आरोप केले आहेत. मागील ३० ते ३५ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून अत्यंत निष्ठेने पक्षाची सेवा करीत आहोत. यापुढेही हे कर्तव्य मी पार पाडणार आहे. मात्र पक्षाच्या वर्तमान संघटनात्मक धोरणामुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची भावना दुखावली आहे. ज्यांनी पक्षाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. इमाने इतबारे पक्षाची सेवा केली आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षवृध्दीसाठी कार्य केले अशांना पक्षात सक्रीय कार्यकर्त्याची पदे बहाल करताना अवहेलना केल्याने मन विषन्न झाले अशीही भावना अडपेवार यांनी व्यक्त केली आहे. आज असे वाटलाय लागले आहे की, कार्यकारिणी बघितली तर असे वाटायला लागले आहे की, निष्ठावान कार्यकत्यांची पक्षाला गरज उरलेली नाही. ज्यांनी ३० ते ३५ वर्ष पक्षाला दिली. त्याचे मुल्यमापन किंबहुना त्यांची किंमत होत नसेल तर एक सामान्य कार्यकर्ता म्हणुन पक्षात राहणे मी पसंत करतो.
मला हे सुध्दा प्रकर्षाने जाणवु लागले आहे की, जे लोक दलबदलु आहेत, ज्यांच्या निष्ठा नेहमीच संशयाच्या भोव-यात राहील्या आहेत अशांचा सन्मान करीत त्यांना महत्वाच्या पदाची जबाबदारी बक्षीस म्हणून सोपविण्यात आली आहे. तर माझ्या सारख्या इतर अनेक सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान देखील दिले गेले नाही. पक्षाची कार्यकारिणी बघून आता सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पक्षाची सेवा करीत राहावे असे दिसत आहे अशीही भावना माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अडपेवार हे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या गटाचे आहेत. सध्या अहीर जिल्ह्याच्या राजकारणात आमदार किशोर जोरगेवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे अडपेवार यांच्या अशा अचानक राजीनाम्यामुळे भाजपात वादळ उठले आहे. दरम्यान आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु आहे.