चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हातील राजुरा विधानसभा मतदारसंघात इरो नेट ऑनलाईन प्रणाली द्वारे बोगस मतदार नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात तहसीलदार राजुरा यांनी १९ आक्टोंबर २०२४ रोजी राजुरा पोलिस स्टेशन येथे एफआयआर क्रमांक ०६२९ नुसार गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.
मात्र, वारंवार पाठपुरावा करून ज्या आय पी एड्रेस द्वारे बोगस मतदार नोंदणी करण्यात आली, अशा संशयित मतदान चोरी करणाऱ्यांचा शोध अजूनही निवडणूक आयोग व यंत्रणा घेऊ शकली नाही. याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, ७० – राजुरा विधानसभा मतदारसंघ यांना विचारणा केली असता संबंधित माहिती इरो नेट वर इरो लाॅगीन मध्ये उपलब्ध नसल्याचे कारण देत सदर माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून उपलब्ध करून घेण्याबाबत कळविले. राजुरा येथे मतांची चोरी झाली हे उघड सत्य असल्याचा आरोप माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी केला आहे.
या प्रकारामुळे निवडणूक आयोग व संबधित यंत्रणा यांची भुमिका संशयास्पद दिसून येते. देशातील सर्व सामान्य जनतेच्या व मतदारांच्या मौलीक अधिकारावर घाला घालुन, भारतीय लोकशाही व संविधानाचा गळा आवळून, मत चोरी द्वारा काही विशिष्ट लोकांना बोगस रित्या जिंकविण्याचे काम होत असल्याचा संशय बळावला आहे. यावरून चंद्रपूर जिल्हातही मोठय़ा प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ६ महिन्यात चंद्रपूर जिल्ह्य़ात मतांची लक्षणीय वाढ झाली. राजुरा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये ३ लाख १३ हजार ६११ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये ३ लाख २५ हजार २७८, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये ३ लाख ५६ हजार ७३६ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये ३ लाख ७३ हजार ९२७, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये ३ लाख १ हजार २४२ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये ३ लाख १२ हजार ३५५, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये २ लाख ७१ हजार ४७८ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये २ लाख ७५ हजार ६६६, चिमूर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये २ लाख ७७ हजार ९५ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये २ लाख ८० हजार ८२७, वरोरा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये २ लाख ७१ हजार ९८५ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये मध्ये २ लाख ८२ हजार ४९ अशी वाढ झाली.
लोकसभा २०२४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण मतदान १७ लाख ९२ हजार १४७ तर विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये जिल्ह्यातील सहाही मतदार संघाचे मिळून एकूण मतदान १८ लाख ५० हजार १०२ एवढे आढळून आले. यात जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या ६ महिन्यात ५७ हजार ९५५ एवढे मतदार संख्या वाढली. राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तक्रारी नंतर ३ ऑक्टोबर २०२४ नंतर ६,८५३ बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती हे विशेष. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी नंतरही अजून पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने सर्व सामान्य मतदाराच्या मनात संशय बळावला असल्याचा आरोप माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे.