चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत चंद्रपूर तालुका ‘अ’ गटातून दिनेश चोखारे एका मताने, ओबीसी गटातून गजानन पाथोडे दोन मताने विजयी झाले तर राजुरा ‘अ’ गटात माजी आमदार सुदर्शन निमकर ईश्वरचिठ्ठीने निवडून आले. ‘ब’ गट २ मधून रोहित बोम्मावार, एसटीव्हीजेएनटी गटात यशवंत दिघोरे व एससी गटातून ललित मोटघरे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. दरम्यान, बँकेच्या २१ संचालकांमध्ये सर्वाधिक संचालक आपलेच निवडून आल्याचा दावा काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
बँकेच्या २१ संचालकांपैकी १३ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी (१० जुलै) ८ संचालक पदासाठी मतदान झाले. त्यानंतर शुक्रवारी (११ जुलै) येथील चांदा इंडस्ट्रियल सोसायटीत सकाळी दहा वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिलाच निकाल चंद्रपूर तालुका अ गटाचा आला. यात काँग्रेसचे दिनेश चोखारे यांनी सुभाष रघाताटे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. चोखारे यांना १५ तर रघाताटे यांना १४ मते मिळाली. वरोरा तालुका अ गटात जयंत टेमुर्डे विजयी झाले. त्यांनी बँकेचे विद्यमान संचालक डॉ. विजय देवतळे यांचा पराभव केला.
सिंदेवाही अ गटात निशिकांत बोरकर तर कोरपना अ गटात विजय बावणे विजयी झाले. राजुरा अ गटात भाजपचे माजी आमदार सुदर्शन निमकर व नागेश्वर ठेंगणे यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोघांनाही प्रत्येकी बारा मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी टाकण्यात आली. ईश्वरचिठ्ठीत निमकर विजयी झाले. ब गट दोनमध्ये सावलीचे रोहित बोम्मावार यांनी विक्रमी २१३ मते घेत विजय मिळवला. त्यांच्याविरुद्ध निवडणूक रिंगणात असलेले किशोर ढुमणे यांना ६७ तर उमाकांत धांडे यांना अवघी ९ मते मिळाली.
एससी गटात ललित मोटघरे ५३२ मतांसह विजयी झाले. त्यांचे विरोधक बांबोळे यांना कमी मते मिळाली. तर एसटीव्हीजेएनटी गटात यशवंत दिघोरे ३७२ मतांसह विजयी झाले. त्यांचे विरोधक बँकेचे विद्यमान संचालक दामोदर रूयारकर यांना २६६ मते मिळाली. दरम्यान काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, तर भाजपच्या विजयी उमेदवारांचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार यांनी अभिनंदन केले.
चिमूर व नागभीड तालुक्यांनी निकाल बदलला
या निवडणुकीत सर्वाधिक अटीतटीची लढत ओबीसी गटात श्यामकांत थेरे, गजानन पाथोडे व सूर्यकांत खनके या तीन उमेदवारांमध्ये झाली. या गटात काँग्रेस समर्थित श्यामकांत थेरे सुरुवातीला शंभर मतांनी आघाडीवर होते. नागभीड व चिमूर या दोन तालुक्यात शंभर टक्के मतदान झाल्याने पाथोडेंनी ३९ मतांची आघाडी घेतली. मात्र पोंभूर्णा, मूल व गोंडपिंपरीत पुन्हा थेरे यांनी मते घेतली. परंतु थेरे ३९ मतांची आघाडी कमी करू शकले नाहीत. अशा पद्धतीने पाथोडे तीन मतांनी विजयी झाले.
दरम्यान थेरे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यात थेरे यांच्या मतात एका मताची भर पडली तर एक मत अवैध ठरवण्यात आले. परंतु, तरीही पाथोडेंचा अवघ्या दोन मताने निसटता विजय झाला. यात पाथोडे यांना ३००, थेरे यांना २९८ तर खनके यांना २४२ मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत चिमूर व नागभीड या दोन तालुक्यांनी निकाल बदलला.
१३ संचालक बिनविरोध
बँकेत यापूर्वीच १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभ धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे व आवेश खान पठाण यांचा समावेश आहे.