चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. २१ संचालकांपैकी १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. आठ जागांसाठी गुरुवार, १० जुलैला मतदान होईल. त्यामुळे सर्वधिक संचालक निवडून आणत बँकेत आपल्याच पक्षाचा अध्यक्ष बनावा, यासाठी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते धावपळ करीत आहेत. त्यामुळे घोडेबाजारही तेजीत आहे.
बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस २० ते २१ इतके कमी मतदार असलेल्या ‘अ’ गटात आहे. या गटात एका मताची किंमत पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत गेल्याची चर्चा आहे. वरोरा तालुक्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यमान संचालक विजय देवतळे यांचे नामनिर्देशन रद्द झाले. त्यामुळे जयंत टेमुर्डे विजयी होतील, असा कयास होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे देवतळे पुन्हा रिंगणात आले. आता टेमुर्डे यांचा सामना देवतळे आणि वसंत विधाते यांच्यासोबत आहे. देवतळेंचे पुतणे या क्षेत्राचे आमदार आहेत. त्यामुळे येथील लढत चुरशीची आहे.
चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांचा आशीर्वाद मिळवण्यात यशस्वी झालेले दिनेश चोखारे आणि सुभाष रघाताटे यांच्यात लढत आहे. रघाताटे यांनी आधीच मतांची जुळवाजुळव केली. त्यामुळे चोखारे यांना मतांची जुळजुळव करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. राजुरा येथे नागेश्वर ठेंगणे यांच्या बिनविरोध विजयाच्या उत्साहावर न्यायालयाने पाणी फेरले. माजी आमदार सुदर्शन निमकर यांचा नामनिर्देश अर्ज ग्राह्य धरण्यात आला. ठेंगणे यांच्या पाठीशी काँग्रेसची ताकद आहे. मात्र निमकर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांचा पाठिंबा मिळवल्याची चर्चा आहे. शेतकरी संघटनेची काही मते निमकर यांच्या पारड्यात जावू शकतात, असे बोलले जाते.
ब-२ गटात रोहित बोम्मावार व किशोर ढुमणे यांच्यात थेट लढत आहे. या गटात उमाकांत धांडे आणि ॲड. वासुदेव खेळकर हे आणखी दोन उमेदवार आहेत. या गटात ३०८ मते आहेत. बोम्मावार यांच्याकडे आर्थिक ताकद आहे. ढुमणे यांच्या मागे जुन्या संबंधांची साखळी आणि काही काँग्रेस नेत्यांचा उघड पाठींबा आहे. आमदार बंटी भांगडिया यांच्यासाठी ओबीसी गटातील गजानन पाथोडे यांचा विजय प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. काँग्रेस नेत्यांनी शामकांत थेरे यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली आहे. या गटात ९०८ मते आहे. या दोघांशिवाय सूर्यकांत खनके आणि शरद जिवतोडे हेसुद्धा रिंगणात आहेत. थेरे यांचे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांशी जवळीक असल्याने त्यांना संधी असल्याची चर्चा आहे.
अनुसूचित जाती-जमाती गटात प्रशांत बांबोडे, ललित मोटघरे, कोमल खोब्रागडे, मधुकर भगत, ॲड. नारायण जांभुळे रिंगणात आहे. मोटघरे यांच्या मागे काँग्रेसने शक्ती उभी केली आहे. भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातून पांडुरंग जाधव, दामोदर रुयाकर, यशवंत दिघोरे, अशी लढत आहे. रुयाकर यांना काँग्रेस, तर यशवंत दिघोरे यांना भाजपचा पाठिंबा आहे.