चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी आज गुरुवार १० जुलै रोजी मतदान होत आहे. सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेत जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्यासह अनेक दिग्गज नेते रिंगणात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांत या निवडणुकीबाबत अनेक राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते यामध्ये सक्रिय सहभागी झाले आहेत.

या दरम्यान अनेक युती झाल्या आणि अनेक तुटल्या. अशातच आज मतदानाच्या दिवशी या निवडणुकीत मतदान केंद्र परिसरात दोन उमेदवारांमध्ये हाणामारी झाली. चंद्रपूर तालुका “अ” गटातून निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांमध्ये दिनेश चोखरे आणि सुभाष रघाटाटे यांच्यात इंडस्ट्रियल इस्टेट या मतदान केंद्रावर जोरदार वाद झाला. हा वाद शाब्दिक शिवीगाळ आणि धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार समोरासमोर आले आणि मतदान केंद्रात काही आक्षेपार्ह गोष्टीवरून जोरदार वाद झाला. वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण फारसे बिघडले नसले तरी, मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही पक्षांनी त्यांच्या समर्थकांना तिथे बोलावण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. आता संपूर्ण जिल्हा दिवसभरात काय घडामोडी घडतात यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान या हाणामारीच्या घटनेनंतर निवडणुक अधिकारी यांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच मतदान केंद्र परिसरात कुणीही बाहेरच्या व्यक्तीने प्रवेश करू नये यासाठी स्वतः निवडणूक अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तब्बल तेरा वर्षांनंतर बँकेची निवडणुक होत आहे. हाणामारीच्या घटनेपूर्वी उमेदवार सुभाष रघाताटे यांच्या समर्थकांनी मतदान केंद्राचे मुख्य दरवाजे आतून बंद करत केंद्र अडवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरे उमेदवार दिनेश चोखारे यांच्या समर्थकांनी बाहेरून दरवाजे ठोठावत यावर जोरदार आक्षेप घेतला. या गोंधळामुळे मतदान प्रक्रियेला अडथळा आल्याने उमेदवार दिनेश चोखारे यांनी संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर बँकेच्या एकूण २१ संचालक पदांपैकी १३ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत . उर्वरित ८ जागांसाठी मतदान सुरू आहे. यात ओबीसी प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती- जमातीसाठी आणि भटक्या विमुक्त गट या जागांचा समावेश आहे . अ गटात एका मताची किंमत ५ लाख रुपये पर्यंत आहे. तर ब गट २ मध्ये एका मताची किंमत१५ ते २० हजार रुपये आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये १४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत असून त्यासाठी शंभरहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी ११ जुलै रोजी चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट येथे होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या समन्वयातून बँकेवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपकडून आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र आहे. मतदान केंद्रावर झालेल्या या गोंधळामुळे मतदान प्रक्रिया पारदर्शकतेत झाली नाही. आम्ही संबंधित केंद्रावरील मतदान रद्द करण्याची मागणी चंद्रपूर तालुका अ गटाचे उमेदवार दिनेश चोखारे यांनी केली आहे.