चंद्रपूर : चंद्रपूर शहर महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय महिला आरक्षणाचे आराखडे आज मंगळवारी जाहीर करण्यात आले. नगर सेवकांच्या एकूण ६६ जागांपैकी ३३ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

अनुसूचित जाती (अजा) : १३ जागांपैकी ७ महिला अनुसूचित जमाती (अज) : ५ जागांपैकी ३ महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) : १७ जागांपैकी ९ महिला सर्वसाधारण प्रवर्ग : ३१ जागांपैकी १४ महिला जागा राखीव आहे. या जाहीर आरक्षणामुळे काहींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असला, तरी अनेक विद्यमान नगरसेवकांना मोठा फटका बसला आहे. काही प्रभागांमध्ये तर राजकीय समीकरणेच उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्र. ३ एमईएल मधे मनसेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांना धक्का बसला आहे. दोन वेळा नगरसेवक असलेले मनसेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांना यंदाच्या आरक्षणाचा फटका बसला आहे. या प्रभागात आता महिला आरक्षण लागल्याने भोयर यांना निवडणूक लढवता येणार नाही.

प्रभाग क्र. ४ बंगाली कॅम्प मध्ये काँग्रेस-अपक्ष आमने सामने आहे. या प्रभागात आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी फक्त एकच जागा राहिल्याने विद्यमान दोन नगरसेवक — अमजद अली (काँग्रेस) आणि अजय सरकार (अपक्ष) — यांच्या दरम्यान थेट सामना होण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्र. ५ विवेक नगर येथे भाजपच्या दोन नेत्यांना फटका बसला आहे. या प्रभागात एससी महिला आरक्षण न आल्याने विद्यमान नगरसेविका पुष्पा उराडे (भाजप) यांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर येथे ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्याने माजी उपमहापौर संदीप आवारी (भाजप) यांना आता खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे.

प्रभाग क्र. ७ जटपुरा गेट मधून राहुल घोटेकर यांची अडचण होणार आहे. या प्रभागात एससी महिला आरक्षण लागू झाल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक राहुल घोटेकर यांना फटका बसला असून, त्यांना जागा बदलावी लागण्याची शक्यता आहे.

प्रभाग क्र. १६ हिंदुस्तान लालपेठ कॉलरी येथे शाम कनकम यांना फटका बसला आहे. या प्रभागातही एससी महिला आरक्षण निघाल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक शाम कनकम यांना मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता असून, आगामी काही दिवसांत उमेदवार निवडीसाठी पक्षांमध्ये चुरस वाढणार आहे.