चंद्रपूर : लोकसभा उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले. त्यामुळेच वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे पाठ फिरविली असतांना आमदार धानोरकर यांनी बुधवारी ब्रम्हपुरी येथे वडेट्टीवार यांची भेट घेवून ५ मार्च रोजी काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व खासदार मुकुल वासनिक यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तसेच प्रचारात सक्रीय भूमिका घेण्याची विनंती केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे हजर होते.

लोकसभेच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चांगलेच मतभेद झाले आहेत. वडेट्टीवार यांनी लोकसभेसाठी स्वत:ची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले होते. तर आमदार धानोरकर यांनी खासदार पती सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या अकाली मृत्यूनंतर नैसर्गिक न्यायाप्रमाणे उमेदवारी मलाच मिळावी अशी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे वडेट्टीवार यांनी शेवटपर्यंत धानोरकर यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. शेवटचा पर्याय म्हणून जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी गळ काँग्रेस श्रेष्ठींकडे घातली. मात्र आमदार धोटे यांनी लोकसभा निवडणूक लढायचीच नाही असा मेल प्रदेश प्रभारी तथा काँग्रेस श्रेष्ठींना पाठविला. त्यामुळे श्रेष्ठींनी एक तर वडेट्टीवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अन्यथा आमदार धानोरकर यांना उमेदवारी देवू अशी भूमिका घेतली. शेवटी वडेट्टीवारांनी लोकसभा लढण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर आमदार धानोरकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. याच दरम्यान आमदार धानोरकर यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे पती खासदार बाळू धानोरकर यांचा मृत्यू झाला असा आरोप करून वडेट्टीवारांवर निशाना साधला. त्याच दरम्यान धनोजे कुणबी समाजाच्या जिल्हाध्यक्षांच्या नावाने एक बनावट पत्रक सार्वत्रिक करून वडेट्टीवार यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय वितुष्ट आणखी वाढले. याच दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी वडेट्टीवार यांना सोबत घेवू नका असाही सल्ला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

हे सर्व राजकारण सुरू असताना आमदार धानोरकर यांची उमेदवारी काँग्रेस श्रेष्ठींनी जाहीर केली. त्यानंतर आमदार धानोरकर यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे नाव घेण्याचे टाळले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद वाढले. त्याचा परिणाम वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे पाठ फिरवली. गडचिरोली व वर्धा येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नामांकन दाखल करण्यासाठी गेलेले वडेट्टीवार चंद्रपूरकडे फिरकले नाही. वडेट्टीवार नाराज आहेत, चंद्रपूरला प्रचाराला येणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र आहे. या चर्चेमुळे काँग्रेस उमेदवाराचे नुकसान होत असल्याची बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली. या दरम्यान आमदार सुभाष धोटे यांनीही वडेट्टीवार यांना फोन केले. योग जुळून येत नाही हे लक्षात येताच शेवटी बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार धानोरकर व आमदार सुभाष धोटे ब्रम्हपुरी येथे वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी धडकले. तेथे वडेट्टीवार यांची भेट घेवून ५ मार्च रोजी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व खासदार मुकूल वासनिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती दिली. या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देत प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली.

हेही वाचा – “काँग्रेस बाबासाहेबांप्रमाणे बाळासाहेबांनाही निवडून येऊ देत नाही”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

हेही वाचा – आमदार बच्‍चू कडूंचा भाजपला जाहीर सभेत इशारा; म्हणाले, “तुरुंगात टाकले, तरी बेहत्‍तर…”

यावेळी वडेट्टीवार, धोटे व धानाेरकर यांच्याच कॅबिनमध्ये बंदव्दार चर्चाही झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, वडेट्टीवार चंद्रपूरला येणार असल्याची माहिती आमदार धोटे यांनी दिली.