अमरावती: अमरावती विमानतळावरून अमरावती-पुणे, अमरावती-कोल्हापूर-गोवा आणि अमरावती-हैदराबाद-तिरूपती या तीन मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे. यासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विमानसेवेच्या विस्ताराचे संकेत दिले आहेत.

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विमान वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे.व्यवहार्यता तफावत निधीच्या (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) माध्यमातून अमरावतीहून पुणे, हैदराबाद, तिरूपती, गोवा या शहरांना विमानसेवेने जोडणे शक्य होऊ शकेल, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

विमानसेवेत जर व्यवहार्यता नसेल, तर ती सेवा बंद पडते. त्यामुळे सरकारने ‘व्हीजीएफ’च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. अमरावतीहून या शहरांसाठी जर विमानसेवा सुरू करायची असेल, तर शासनाला तिकिटाच्या मागे पैसे द्यावे लागतील. प्रवाशांना महागडे दर परवडू शकणार नाहीत, असे बावनकुळे यांचे म्हणणे आहे.

काय आहे मागणी?

येथील हौशी पर्यटक समूहाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन देत अमरावतीहून पुणे, बंगळुरू आणि अहमदाबादसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या नव्या सेवांमुळे केवळ पर्यटकांनाच नाही, तर शिक्षण, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठा फायदा होईल, असे समूहाने नमूद केले आहे.

– पुणे: अमरावतीहून मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी आणि आयटी क्षेत्रात नोकरीसाठी पुण्यात जातात. सध्या रेल्वे आणि बसमध्ये नेहमीच गर्दी असते. रेल्वेचे तिकीट नेहमीच प्रतीक्षायादीत असते. पुणे विमानसेवा सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात प्रवासी उपलब्ध होतील.

 – बंगळुरू आणि अंदमान: बंगळुरूमध्ये नोकरीनिमित्त असलेला आणि अंदमान तसेच दक्षिण भारतात पर्यटनासाठी जाणारा अमरावतीतील एक मोठा वर्ग आहे. त्यांच्यासाठी बंगळुरू विमानसेवा अत्यंत उपयुक्त ठरेल.

 – अहमदाबाद: अमरावती हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध झाले आहे. नांदगाव पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र ‘टेक्सटाईल हब’ म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे अहमदाबादशी थेट विमानसेवेने जोडल्यास व्यापारी वर्गाला मोठा फायदा होईल.

नाइट लँडिंगची मागणी

हौशी पर्यटक समुहाने अमरावती विमानतळावर रात्रीच्या वेळी विमानांना उतरण्याची म्हणजेच ‘नाइट लँडिंग’ची सुविधा सुरू करण्याची मागणीही केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा विमानतळावर उपलब्ध असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. विमानसेवेचा विस्तार झाल्यास केवळ अमरावतीच नव्हे, तर अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम यांसारख्या शेजारील जिल्ह्यांतील प्रवाशांसाठीही फायदेशीर ठरतील.विजय शिंदे, संयोजक, हौशी पर्यटक समूह