नागपूर : चित्ता प्रकल्पाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात भारतात १२ ते १४ चित्ते आणण्याची केंद्राची योजना आहे. मात्र, यावेळी चित्ते नामिबियातून नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेतून आणले जाणार आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने तसे संकेत दिले आहेत. नामिबिया येथून १७ सप्टेंबर २०२२ रोजी आठ, तर दक्षिण आफ्रिकेतून १८ फेब्रुवारी २०२३ रोजी १२ चित्ते भारतात आणण्यात आले होते. मध्यप्रदेशतील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यांपैकी आता केवळ एका मादीसह अन्य १४ चित्ते वाचले आहे.

चित्त्यांच्या एकापाठोपाठ एक मृत्यूनंतर या प्रकल्पावर टीका केली जात होती. चित्त्यांचे बिघडलेले आरोग्य आणि व्यवस्थापनावर वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासकांचा रोष होता. त्यामुळे आता मध्यप्रदेशातच इतर दोन अभयारण्ये चित्त्यांचा अधिवास म्हणून विकसित केली जात आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत हा अधिवास तयार होईल, अशी मध्यप्रदेश सरकारला अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले जाणार आहेत. त्यासाठी चित्त्यांची निवड काळजीपूर्वक केली जात आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून आणलेल्या चित्त्यांच्या स्थितीचा अहवाल जुलै २०२३ मध्ये प्रकाशित झाला. मध्यप्रदेशातील गांधीसागर अभयारण्य चित्त्यांच्या नवीन तुकडीचा अधिवास असू शकतो.

 दरम्यान, नामिबियातून चित्ते न आणण्याच्या निर्णयामागे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही चित्ता व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त केल्यामुळे नामिबियातून चित्ते न आणण्याचा निर्णय भारताने घेतला असावा, असा अंदाज येथील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नामिबियापेक्षा दक्षिण आफ्रिकेतील चित्ते भारतीय वातावरणात लवकर एकरूप होतील, असाही एक तर्क मांडला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्त्यांचे मृत्युसत्र

नामिबियातील ‘ज्वाला’ या चित्त्याने चार बछडय़ांना जन्म दिला होता. त्यातील तीन बछडय़ांचा मृत्यू झाला. २७ मार्चला ‘साशा’ ही नामिबियन मादी मूत्रिपड निकामी झाल्यामुळे मरण पावली. २४ एप्रिलला दक्षिण आफ्रिकेतील ‘उदय’चा हृदयविकाराने मृत्यू झाला. ११ जुलैला ‘तेजस’ हा नामिबियन चित्ता मृतावस्थेत आढळला होतरा. ९ मे रोजी दक्षिण आफ्रिकेतील ‘दक्षा’ ही मादी मृत्युमुखी पडली. २ ऑगस्टला नामिबियातीलच ‘धात्री’ मृतावस्थेत आढळली. दक्षिण आफ्रिकेतील ‘सुरज’चा १३ जुलैला मृत्यू झाला.