नागपूर : “लोकसत्ता” ने सातत्याने “सीएम” उर्फ “छोटा मटका” याच्या आरोग्यावर सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने त्याला बुधवारी सायंकाळी जेरबंद केले. मात्र, त्याच्या उपचाराचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

तीन ते साडेतीन महिन्यांपूर्वी पर्यटकांना लळा लावणारा हा वाघ दुसऱ्या वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत गंभीर जखमी झाला. रक्ताने ओथंबलेल्या या वाघावर खरे तर त्याचवेळी उपचाराची आवश्यकता होती. वन्यप्राण्यांना शक्यतोवर नैसर्गिकरित्या ठीक होऊ देणे हीच साधारण पद्धत किंवा नियम आहे. मात्र, “सीएम” उर्फ “छोटा मटका” या वाघाची जखम नैसर्गिकरित्या ठीक होणाऱ्यातली नव्हती. त्याला त्याचवेळी उपचाराची नितांत आवश्यकता होती. पायाला चिरा पडलेला होता आणि पाय फ्रॅक्चर असल्याचे त्याचवेळी जाणवत होते. तरीही स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

महिना होऊनही या वाघाची जखम बरी न होता ती वाढत गेली आणि त्यावेळी “लोकसत्ता” ने दिलेल्या वृत्तानंतर त्यावर थातूरमातूर उपचार करण्यात आले. मात्र, त्यावेळी उपचार करणाऱ्या पशुवैद्यकाना त्याचे गांभीर्य कळले नाही का, असा प्रश्न या वाघावर जीव ओवळणाऱ्या पर्यटक आणि वन्यजीव तज्ज्ञांना पडला. या वाघाचा पाय ज्यापद्धतीने सुजला होता, त्याचवेळी त्याच्या पायाला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट होते. मात्र, हे त्यावेळी उपचार करणाऱ्या पशुवैद्यकाचा कळले नाही का, हाही प्रश्न आहे. तो शिकारही करू शकत नव्हता तेव्हा वनखात्याने त्याला पशुधन पुरवले आणि त्याच्यासाठी नंतर पशुधनाची शिकार हाच पर्याय राहिला. आता त्याला पकडण्याचे कारण म्हणजे मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये, असे वनखाते प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणत आहे. प्रत्यक्षात या वाघाचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, की माणसांच्या गर्दीत राहूनही किंवा एकटा वनखात्याचा कर्मचारी असतानासुद्धा त्याने कधी माणसांवर हल्ला केला नाही आणि म्हणूनच परिसरातील गावकऱ्यांचा देखील त्याच्यावर जीव होता. “सीएम” उर्फ “छोटा मटका” वर उपचार व्हावेत ही त्यांचीही मागणी होती. मात्र, “लोकसत्ता” च्या वृत्तानंतर आणि या वृत्ताची दखल घेऊन न्यायालयाने स्वतावून याचिका दाखल केल्यानंतर व्यवस्थापनाला जाग आली.

सध्या या वाघाची अवस्था अतिशय गंभीर आहे. त्याचा पाय फ्रॅक्चर असून त्याला गँगरीन झाला असण्याची देखील दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाले असल्यास त्याच्या लँग्ज आणि हार्टवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याला तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूकडून उपचाराची गरज आहे. चंद्रपूरमध्ये असलेले पशुवैद्यकीय अधिकारी वाघाला ट्रॅक्वीलाईज करण्यात तज्ञ आहेत. या वाघाला ज्या पद्धतीच्या उपचाराची गरज आहे, ते पाहता चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये या सुविधा नाहीत. शिवाय तज्ञ डॉक्टरांची देखील वानवा आहे. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाला खरोखरच कोट्यवधींचा महसूल मिळवून देणारा हा वाघ वाचवायचा असेल तर त्वरीत गोरेवाडा वन्यप्राणी बचाव व उपचार केंद्र तसेच सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या तज्ञ पशुवैद्यकाशी संपर्क साधायला हवा आणि उपचारासाठी त्याठिकाणी हलवायला हवे, अन्यथा “सीएम” उर्फ “छोटा मटका” या वाघाचा पाय कापण्याची आणि त्याला कायमचा जेरबंद करण्याची वेळ येईल.