नागपूर : न्या.भूषण गवई यांनी मे महिन्यात सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. यानंतर ते अनेकदा महाराष्ट्राच्या विशेषत: नागपूर दौऱ्यावर आले आहे. जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात सरन्यायाधीश गवई दोन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर होते.

एक कार्यक्रम संविधान पार्कच्या उद्घाटनाचा होता तर दुसरा कार्यक्रम महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा होता. विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी फडणवीस मंचावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड काळात केलेल्या कार्याचे कौतूक केले होते.

सरन्यायाधीशांचे ते विधान राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सरन्यायाधीश गवई पुन्हा एकदा नागपूर दौऱ्यावर आले. नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि सरन्यायाधीश गवई एकत्रितपणे उपस्थित होते. या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी फडणवीस यांच्या भाषणादरम्यानच त्यांना थांबविले आणि त्यांना त्यांची चूक सांगितली. कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी फडणवीस यांना इशारा करत चूक दुरुस्त करण्यासाठीही सांगितले.

फडणवीसांनी कोणती चूक केली?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह एका कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमात फडणवीस यांनी भाषणाची सुरूवात केल्यावर मंचावर बसलेल्या सरन्यायाधीश गवईंनी फडणवीसांना टोकले आणि त्यांची चूक सांगितली. फडणवीस भाषणात म्हणाले,‘ या पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये डॉ.आंबेडकर कॉलेजच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या या भूमीचे सुपूत्र आणि भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, या ठिकाणी विशेषसत्वाने मंचावर उपस्थित असलेले बॉम्बे हायकोर्टचे वरिष्ठ न्यायाधीश श्री चंद्रशेखर साहेब, माझे सहकारी आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाठजी, मातोश्री डॉ.कमलताई गवई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंदत आर्य नागार्जुन सुरई ससाईजी, इथल्या प्रिन्सिपल डॉ.दीपा पान्हेकरजी, या ठिकाणी उपस्थित डॉ.राजेंद्र गवई, भंते नागदीपांकर, डॉ.प्रदीप आगलावे, विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, मंचावरील सर्व मान्यवर, असे अनेक नाव फडणवीसांनी घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर फडणवीस यांनी समोर बसलेले दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे, ’ असे म्हणताच सरन्यायाधीशांनी फ़डणवीसांना टोकले. फडणवीसांनीही स्मितहास्य देत न्या.गवईंकडे बघितले. सांबरे यांचा उल्लेख ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून करण्याचा इशारा सरन्यायाधीशांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लगेच चूक सुधारत ज्येष्ठ न्यायाधीश असा उल्लेख केला. यानंतर जेव्हा न्या.गवई भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्राचे तडफदार मुख्यमंत्री म्हणून केला.