अमरावती : मेळघाटात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावत आहे. चिखलदरा येथे शनिवारी आणि रविवारी पर्यटकांच्या वाहनांचा ओघ चिखलदराच्या घाटात दिसून आला. चिखलदरा येथे रस्त्यावर वाहन उभे करायलाही जागा नसल्यामुळे घाटात सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. चिखलदरा नाक्यापासून खाली थेट मोथा आणि मडकी गावापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली.
चिखलदरा येथे पावसाच्या धारांनी बहरलेल्या निसर्गाचे अनोखे रुप पर्यटकांना अनुभवायाला मिळते. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी चिखलदऱ्याने मात्र आपले सौंदर्य फुलवायला अजिबात वेळ लावला नाही. या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात, पण या आठवडा अखेरीस वाहतूक कोंडीने अनेकांचा हिरमोड झाला.
भीमकुंडावरून कोसळणारा धबधब्यासह चिखलदरा येथील विविध पर्यटन स्थळांचा आनंद लुटण्यासाठी अमरावतीसह नागपूर, अकोला, यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातून पर्यटक आले. घाटातून समोर वाहने जात नसल्यामुळे अनेकांना चिखलदऱ्याला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. अनेक पर्यटक सेमाडोह आणि मुक्तागिरीकडे वळले. तर काही पर्यटक चक्क आलेल्या मार्गाने आपल्या गावी परतले.
चिखलदरा येथे दोनशेच्या वर राहण्याची व्यवस्था असणारे सर्व हॉटेल्स बुक झाले. त्यामुळे अनेकांना चिखलदरा येथे इच्छा असूनही मुक्कामी राहणे शक्य झाले नाही. विशेष म्हणजे चिखलदरा येथून बाहेर पडण्यासाठीदेखील पर्यटकांना मोठी कसरत करावी लागली.
चिखलदरा पर्यटनस्थळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या पावसाळ्यातील तीन महिन्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. प्रामुख्याने आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक चारचाकी, दुचाकी, ऑटो, ट्रॅव्हर्ल्स, बस अशा वाहनांनी चिखलदरा येथे येत असतात. प्रामुख्याने पर्यटक हे चिखलदरा ते परतवाडा या मार्गाचा वापर करतात. हा रस्ता अरूंद असून नागमोडी वळणाचा आहे.
येत्या २८ सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कालावधीतील दर आठवड्याच्या शनिवार व रविवार या दिवशी चिखलदरा येथे येण्यासाठी परतवाडा ते चिखलदरा या मार्गावरील वाहतुक ही परतवाडा वरून धामणगाव गढी मार्गे चिखलदरा या मार्गाने तर चिखलदरा येथून जाण्यासाठी चिखलदरा ते परतवाडा या मार्गावरील वाहतुक घटांग, परतवाडा या प्रकारे एक मार्गी (वन-वे) वळविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. तरीही वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली.