बुलढाणा : बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंसह २३ पदाधिकारी व कार्यकर्त्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. यामुळे काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची भेट घेऊन रोष व्यक्त केला.
चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते शैलेश गोंधने यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीर जमाव जमवुन अनधिकृतपणे सार्वजनिक विद्युत खांबावर चढून विद्युत खांबाचे नुकसान केले. आपण लावलेले फलक फाडून व जाळून टाकले, अशी तक्रार गोंधणे यांनी केली होती.
तक्रारीनुसार गोंधने यांनी चिखली शहरामध्ये ३१ ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी ६५ ठिकाणी फलक लावले. ते लावण्यासाठी नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेवून ‘थोडे धावा शेतकऱ्यांचे १०० कोटी जमा करण्यासाठी,’ असे कोणाचेही नाव न टाकता फलक लावले होते. मात्र सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास राहुल बोन्द्रे, नितीन वाघ, राहुल सवडतकर, रिकी काकडे, कैलास जंगले, शेखर देशमुख, खलील बागवान, डॉ. इसरार, शिवराज बाबुराव पाटील, राम जाधव,अमित कोटवे, अतहरोद्दीन काझी, गोकुळ शिंगणे व इतर आठ-दहा कार्यकर्त्यांनी हे फलक फाडून जाळून टाकले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना बोन्द्रे व २२ पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून अनधिकृतपणे सार्वजनिक विद्युत खांबावर चढुन नुकसान केले, असे तक्रारीत नमूद केले. यावरून बोन्द्रे व पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
गुन्हे मागे घ्या : हर्षवर्धन सपकाळ
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची भेट घेतली. ‘मी धावतो व्होटचोरी रोखण्यासाठी’ या शांततामय कार्यक्रमातील गुन्हे मागे घ्या, चिखली ठाणेदार संग्राम पाटील यांना निलंबित करा, अशा मागण्या करणारे निवेदन पोलीस अधिक्षकांना देण्यात आले.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, ‘मी धावतो व्होट चोरी रोखण्यासाठी’ या शांततामय मॅरेथॉनचे काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम शांततेने पार पडला. मात्र बोंद्रे तसेच इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांविरोधात स्फोटक व ज्वालाग्रही पदार्थांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचे अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कृती केवळ तथ्यहीन नाही, तर ती लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी व संविधानाच्या मुल्यांच्या अपमान करणारी आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, चिखली ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे, अशा मागण्या सपकाळ यांनी केल्या.शिष्टमंडळात आमदार धिरज लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान सौदागर, विधानसभा समन्वयक राजू गवई, दिपक देशमाने, कुणाल बोन्द्रे, निलेश गावंडे, शहराध्यक्ष दत्ता काकस, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, प्रभाकर वाघ आदींचा समावेश होता.