बुलढाणा : चिखली तालुक्यातील हरणी हे शांतताप्रिय गाव एका प्रौढ इसमाच्या निर्घृण हत्येने हादरले. या इसमाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.काल बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा खळबळजनक घटनाक्रम घडला. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात आढळून आले आहे. गजानन बारकू पवार (वय ५५वर्षे, राहणार हरणी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिवराम कुसळकर (राहणार हरणी तालुका चिखली ) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ आणि दहशतीचे वातावरण आहे.
घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री १०. ३० ते ११ वाजेदरम्यान घडली. मृतक गजानन पवार हे शौचाला जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. ते बराच वेळ परत न आल्याने त्यांचा भाऊ प्रकाश पवार व काही गावकऱ्यांनी गाव परिसरात त्यांचा शोध घेतला. यावेळी गावाबाहेरील मोकळ्या जागी त्यांचा मृतदेह आढळून आला . डोक्यात मोठ्या दगडाने ठेचून हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले झाले. डोक्याला झालेली गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्त्राव यामुळे पवार यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ प्रकाश बारकू पवार (वय ४२, रा. हरणी) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आज गुरुवारी, २८ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी काशीराम कुसळकर याने जुन्या वादाच्या कारणावरूनच गजानन पवार यांचा खून केला. यापूर्वीही तो गजानन पवार यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक निखिल निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ठाकूर व भुतेकर करीत आहेत. दरम्यान, मृत गजानन पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, आई व दोन भाऊ असा मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे हरणी गावात दहशत निर्माण झाली आहे.