नागपूर : ही जमीन आमच्या हक्काची आहे, ही शेती आमची आहे, आमच्या मुलाचे भविष्य या शेतीत आहे आणि आमच्या मुलाचे भविष्य हिसकावून घेण्याचा हक्क अदाणीला कुणी दिला..? दहेगाव गोवारी येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता एक दशलक्ष टन असून, त्याचा विस्तार सुमारे एक हजार ५६२ हेक्टर परिसरात आहे. या प्रकल्पाचा परिणाम गोवारी, सिंदी, खैरी, टोंडा खैरी, बोरगाव खुर्द, बेलोरी, झुनकी, वलनी, खांडाला, पारडी आदी गावांवर होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पामुळे परिसरातील १० गावांसह तेथील शेतकरी, नागरिक, पशुधनासह पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. नागरिकांवर रोग व आजारांचे संकट, विस्थापन, जीवाला धोका, उपजीविकेचे साधन हिरावले जाण्याची भीती आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबुजा सिमेंट्स लि. यांच्या दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय जनसुनावणी बुधवारी सुरू झाली. प्रदूषण मंडळाने प्रकल्प स्थळी, अंबुजा सिमेंट्स लि., दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण, ख. नं. ९०, वलनी, ता. नागपूर (ग्रामीण) येथे जनसुनावणी सुरू करण्याची तयारी केली आहे.
या खाणीला स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना गावकरी म्हणाले, ही जमीन आमच्या हक्काची आहे, ही कुणाच्या बापाची नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही येथे आलो आहोत. आमची उपजीविका शेतीवर आहे. आमची शेती गेली तर आमच्या उपजीविकेचे काय? आमच्या मुलाचे भविष्य काय? जमीन आत पोखरली जाणार, मग भूकंप होणार. आमच्या जीवाची रिस्क आहे. आधीच या गावात दवाखाना नाही, गावात एकही योजना नाही, आमच्या शेतपिकाला भाव नाही, कापसाला भाव नाही. मग अशावेळी खाण याठिकाणी उभारून गावकऱ्यांची भविष्य खराब करण्याचा घाट का घालत आहे. अदाणी उद्योग समुहाच्या प्रस्तावित दहेगाव भूमिगत कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध आहे. यावेळी त्यांनी प्रचंड विरोध केला. आम्हाला लेखी आश्वासन द्या, ही खाण होणार नाही म्हणून.