वर्धा : भारतीय कला परंपरेस विशाल व दीर्घकालीन परंपरा आहे. या कलेची साधना एक प्रकारचे खडतर व्रत समजल्या जाते. आजही असे खडतर व्रत करीत कला साधना करणारे कलाकार दिसून येतात. अशीच नृत्याची साधना महत्त्वाची परंपरेतून विविध नृत्य प्रकार चालत आले आहे.
ही परंपरा पाळून या क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे देशाचे नाव सर्वत्र करतात. मात्र या नृत्य कलेसाठी दसरा हा सण अत्यंत महत्त्वाचा समजल्या जातो. याच दिवशी पूजा करीत वर्षभर साधना केली जाते.
भारताच्या प्राचीन शास्त्रीय नृत्य शैली भरतनाट्यमामध्ये सलंगई पूजा (घुंगरू पूजा) ही आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महती अधोरेखित करते. दसऱ्याच्या दिवशी या पारंपरिक समारंभात नृत्यांगना घुंघरू (सलंगई) परिधान करून आपल्या नृत्य जीवनाची सुरुवात करतात. हा सोहळा फक्त कला उत्सव नाही, तर गुरु-शिष्य संबंध आणि भगवान नटराज यांच्याप्रति श्रद्धेचा प्रतीक समजल्या जातो.
सलंगई पूजेत गुरू शिष्यांना घुंघरू बांधतात आणि मंत्रोच्चारासह भगवान नटराज यांची पूजा करण्यात येते. फुले, फळे, नारळ, दक्षिणा आणि अगरबत्तींनी सजवलेल्या थाळीने या पवित्र समारंभाला विशेष महत्त्व प्राप्त होते. नृत्याचे मूलभूत तत्त्वे – ताल, सोलु कट्टू आणि मुद्रा यात पारंगत झाल्यावर शिष्य या रस्मेत सहभागी होतात.
हे त्यांच्या नृत्य कौशल्याचं प्रमाणीकरणही आहे. या पूजेत घुंगरूला पवित्र मानले जाते. जे नृत्याच्या लय आणि अभिव्यक्तीला उजेड देतं. गुरु-शिष्य परंपरेला बळकट करणारी ही प्रथा प्राचीन गुरुकुल व्यवस्थेची आठवण करून देते, जिथे कला देवतांना समर्पित केली जायची.
भरतनाट्यमामध्ये सलंगई पूजा ही नृत्यांगना साठी आत्मविश्वास आणि अध्यात्मिकतेचा आधार आहे. हे त्यांना अरंगेत्रम (पहिली मंच प्रस्तुति) साठी घेऊन जाते. ही परंपरा सांस्कृतिक वारसा जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सलंगई पूजा (घुंगरू पूजा) ही भरतनाट्यमाची आत्मा आहे, जी कला आणि भक्तीला जोडते.
सलंगई पूजा झाल्याशिवाय घुंगरूंचा वापर करू शकत नाही पूजा झाल्यावर ती घालता येतात, अशी पूजा महती अक्षय कला नृत्य अकादमीचे डॉ. शेखर दंताळे सांगतात. नृत्याप्रति समर्पित ईश्वरी दंताळे या परंपरेला पुढे नेण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले. ही पूजा दसऱ्यालाच का?, या प्रश्नावर उत्तर असे की घुंगरू हे नृत्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. दसरा हा एक शुभ मुहूर्त. म्हणून दसरा सणास घुंगरू पूजा करीत कलेला यश व संरक्षण मिळावे अशी प्रार्थना केली जाते.