महसूल खात्याकडून निवड समितीची स्थापना
नागपूर : राज्यात भूमीअभिलेख विभागात रिक्त असलेल्या सुमारे एक हजारावरील गट ‘क ’ संवर्गातील पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रादेशिक स्तरावरील ही पदे भरण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी याबाबत निर्णय झाला.
राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महसूल विभागात भूमीअभिलेख कार्यालयात गट ‘क’ संवर्गात रिक्त असलेल्या पदांमुळे कामावर परिणाम होत असल्याचे कर्मचारी संघटनांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यानुसार राज्यात या संवर्गातील १०२० पदांना मान्यता देण्याचे शासनाने निश्चित केले होते, असे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले. सोमवारी २५ ऑक्टोबरला या पदांवर भरती करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला. शासनाच्या या निर्णयानुसार तातडीने पदभरतीची प्रक्रिया पार पडली तर कर्मचाऱ्यांवर सध्या असलेला कामाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल, असे भूमीअभिलेख कर्मचारी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप गर्जे यांनी सांगितले.
समितीत कोण?
निवड समितीचे अध्यक्ष जमाबंदी आयुक्त आणि भूमीअभिलेख संचालक असतील. त्याशिवाय ज्या विभागातील पदे भरावयाची आहेत तेथील भूमीअभिलेख उपसंचालक, विभागीय कौशल्य विकास, समाजकल्याण, आदिवासी विकास व इतर संबंधित अधिकारी समितीचे सदस्य असतील.