अकोला : जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे पारस गावातून नागरिकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. शेतातून दुचाकीने घरी जाणारे वडील व मुलगा नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. वातावरणातील उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान, मंगळवारी पहाटे ३ वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस पडला. या पावसाचा सर्वाधिक फटका बाळापूर तालुक्याला बसला आहे. पारस आणि परिसरातील पाच ते सहा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला.

सलग पाऊस सुरूच असल्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील नागरिकांचे साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. बाळापूर व पारस मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच मन प्रकल्पातून आज सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अकोट-देवरी- शेगाव या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती, तर लोहारा गावाजवळील मन नदीच्या पुलावरुन पाणी असल्याने हा रस्ता ९ वाजतापासून बंद करण्यात आला होता. पुलावरून प्रवाह कमी झाल्याने दुपारी वाहतूक सुरळीत झाली.

अकोल्यावरून शेगावला जाणाऱ्या मार्गावर नागझरीजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक बाळापूर तालुक्यात ४३.५ मि. मी. पाऊस कोसळला, तर पातुर तालुक्यात देखील ४०.६ मि. मी. पाऊस झाला आहे. काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेल्हारा तालुक्यामध्ये पंचगव्हाण मंडळातील उबारखेड येथील मनोज नामदेव गवारगुरु व त्यांचा मुलगा वैभव मनोज गवारगुर हे दोघे सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शेतातून दुचाकीने घरी जात होते. यावेळी पंचगव्हाण ते निंभोरा बु. मध्ये नाल्याला पूर आला होता. त्यांनी पुरातून दुचाकी टाकली. यात दुचाकीसह दोघेही वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये वैभव गवारगुर याचा मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळला आहे.