महापालिका निवडणुकींवर डोळा..
पावसाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अद्याप दमदार पावसाने हजेरी लावली नसली तरी पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र सरकारकडून घोषणांचा पाऊस मात्र सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या आढावा बैठकीत नागपूरसाठी अनेक घोषणा केल्या. त्यात टॅन्करमुक्तीसाठी १०० कोटी, प्रमुख मैदानांचा विकास, यासह इतरही घोषणांचाही समावेश आहे.
सध्या महापालिकेवर भाजपची सत्ता असून फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सत्ता काबीज करणे भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले असून चार वॉर्डाचा एक प्रभाग हा त्यापैकीच एक आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकप्रिय घोषणा करून लोकांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नागपूर शहरात उन्हाळ्यात महापालिकेवर एकही मोर्चा आला नाही, हे पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अभिमानाने सांगतात. मात्र, मुख्यमंत्र्यांनी टॅन्करमुक्तीसाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा करून शहरातील सर्वच भागात पाणी पुरवठा सुरळीत नव्हता, ही बाब अधोरेखित केली आहे. शहरातील अनधिकृत वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची समस्या आहे, त्यामुळे तेथे टॅन्करव्दारे पाणी पुरवठा करावा लागतो. तेथे जलवाहिन्या टाकण्यासाठी अमृत योजनेतून १०० कोटी रुपये (पहिला हफ्ता) निधी देण्यात येईल, महापालिकेने यासाठी तात्काळ विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सुरेश भट सभागृहासाठी निधी कमी पडत असल्याने इतर विकास योजनांचा निधी त्याकासाठी वळता करण्यात आला होता. त्याला विरोध झाल्यानंतर आता या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी ६० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. कस्तूरचंद पार्क, चिटणीस पार्क आणि यशवंत स्टेडियम, या शहरातील प्रमुख मैदानांच्या विकास करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. गरिबांसाठी घरकूल बांधण्यासाठी १४० हेक्टर जागेचा प्रस्ताव १५ दिवसात सादर करा, मेट्रो रिजनचा विकास आराखडा ऑगस्टपूर्वी सादर करा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला महापौर प्रवीण दटके, महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी उपस्थित होते.