शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचार यात्रेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्याने अशाप्रकारे एखाद्या उमेदवाराचा प्रचार करणे हा आचारसंहितेचा भंग असल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ नरेंद्र नगर भागातातील प्रभाग क्रमांक ३५ मध्ये बुधवारी सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगरसेवक संदीप जोशी, प्रकाश भोयर यांच्यासह डॉ. नीरज खटी दिसून आले. रॅलीमध्ये डॉ. खटी हेसुद्धा भाजपचा दुपट्टा घालून दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शासकीय अधिकाऱ्यांना निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होता येत नाही. असे झाल्यास तो आचारसंहितचे भंग ठरतो. असे असतानाही डॉ. नीरज खटींसारखे विद्यापीठाचे महत्त्वाचे अधिकारी चक्क मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत दिसून आल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली. डॉ. खटींचे हे छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलेच प्रसारित होत आहे. यावर विविध विद्यार्थी संघटना आणि विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जात आहे. नागपूर विद्यापीठ हे भाजपच्या प्रचाराचे केंद्र झाले आहे, असा आरोप होत असतो. त्यात आता विद्यापीठाचे कुलसचिवच मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसून आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. याप्रकरणी डॉ. खटी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.
विद्यार्थी संघटनांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याविरोधात विद्यार्थी संघटना एकवटल्या असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी स्वत: त्यांना प्रचार करताना बघितल्याचे सांगून विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांनाही भाजपला मतदान करण्यासाठी अशाच प्रकारे संस्थाचालकांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात, आयुक्त, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचे शैलेंद्र तिवारी म्हणाले. तसेच एनएसयूआयतर्फे जिल्हा अध्यक्ष आशीष मंडपे यांनीही निवडणूक आयोग व राज्यपालांकडे खटींविरोधात तक्रार केली आहे.
‘आमच्या परिसरात सकाळच्या वेळेत भाजपची रॅली आली. परिसरातील काही समस्या सांगायला म्हणून मी तिथे गेलो. प्रचार रॅलीशी माझा काहीही संबंध नाही.’ – डॉ. नीरज खर्टी, प्रभारी कुलसचिव.