वर्धा : भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा विधेयकचे जोरदार समर्थन केले. यासंदर्भाने त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे या संभाव्य कायद्यास वर्धा जिल्ह्यातून गांधीवादी व अन्य संस्थानी प्रखर विरोध दर्शवीला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात सरकारकडे आक्षेप नोंदविले होते. त्याची अप्रत्यक्ष दखलच जणू मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली. यांस विरोध कां, याचीही त्यांनी मिमांसा केली.

या विधेयकवर विरोध प्रकटणार म्हणून आम्ही संयुक्त चिकित्सा समिती तयार केली होती. त्यात सर्वच विरोधक सहभागी होते. त्यांचे तीन, चार आक्षेप आम्ही मान्य केले. एकमताने अहवाल तयार झाला. नंतर तो विधेयक स्वरूपात मांडण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एकमताने मान्य झाले, त्यास अचानक विरोध सूरू झाला.

कारण वरून इंजेक्शन आले आणि काही पोपट विरोधात बोलायला लागले. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची स्थिती झाली. कारण यात लोकशाहीविरोधी असे काहीच नाही. संस्थेवर कारवाई होणार व ती पण न्यायमूर्तिनी मंजुरी दिल्यावर. हा विरोध माओवादयांचे  समर्थक करीत आहे. या माओवादी समर्थकांना देशाचे संविधानच मान्य नाही. त्यांचे स्वतःचे संविधान त्यांना अंमलात आणायचे आहे. जंगलातील बंदुकीच्या धाकावरील लढाई ते हरल्याने आता शहरात ते आपल्या समर्थकांच्या मार्फत चळवळ चालवीत आहे.

इतर काही राज्यांनी त्यांना बॅन केल्यावर ते महाराष्ट्रात ठाण मांडून बसले. हे राज्य त्यांच्या चळवळीचे केंद्र झाल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मान्य नसणारेच यांस विरोध करीत आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला आपलाच विक्रम मोडायचा आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप विदर्भात प्रथम क्रमांकावर होता. आता त्यापेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. या निवडणुका आपण महायुती म्हणूनच लढणार. पण प्रसंगी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतल्या जातील. मैत्रीपूर्ण लढत झाली तर मित्र पक्षांवर टीका नको. उद्धव ठाकरेंप्रमाणे करायचे नाही. तसेच पक्षातील मतभेद खपवून घेतल्या जाणार नाही. अनेक पक्ष गटबजीने संपले. भाजपमध्ये हे खपवून घेतल्या जाणार नसून जो पक्षाला खड्ड्यात घालेल त्याला पक्ष खड्ड्यात घातल्या शिवाय राहणार नाही. मी जारी आता सभेतून अन्य ठिकाणी निघून गेलो तरी अन्य कुणीही जाणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांनी बसून चिंतन करावे. विविध विषय समजून घ्यावे. कारण निवडणूक प्रक्रिया सूरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जे नव मतदार झाले, त्यांची नोंदणी करून घ्यावी. पुढे त्यासाठी वेळ मिळणार नाही. हनुमानासारखे आपली ताकद ओळखून उडी घ्या, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.