नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १८ सप्टेंबर रोजी ३१ मिनिटांचे सादरीकरण केले. त्यात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार लोकशाही नष्ट करणाऱ्या आणि मते चोरणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण देत राहुल यांनी दावा केला की काँग्रेस समर्थकांची मते तेथे पद्धतशीरपणे हटवण्यात आली. महाराष्ट्रातही मतचोरी झाली असाही आरोप झाला होता. यानंतर देशभर मतदार चोरीचा मुद्दा गाजला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण (एसआयआर) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण विधान केले. त्यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे स्वागत करत विरोधकांवरही निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला

मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण १०-१५ राज्यांमध्ये सुरू होणार आहे. पुढील वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये प्रथम मतदार याद्यांचे पुनरीक्षण होणार आहे. यात आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. एसआयआरच्या अंमलबजावणीसाठीची चौकट अंतिम करण्यासाठी आयोगाने अलीकडेच राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत दोन बैठका घेतल्या.

अनेक सीईओंनी शेवटच्या एसआयआरनंतर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या मतदार याद्या त्यांच्या संबंधित राज्य वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत. २००८ ची मतदार यादी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळज्ञवर उपलब्ध आहे. २००८ मध्ये तेथे एसआयआर करण्यात आला होता. उत्तराखंडमध्ये, शेवटचा एसआयआर २००६ मध्ये करण्यात आला होता आणि त्यावेळची मतदार यादी आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर आहे. बिहारमध्येही अलीकडेच मतदार पडताळणी करण्यात आली. अंतिम डेटा १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

मतदार चोरीवरून आरोपावरून विरोधक १ नोव्हेंबरला मोर्चा काढणार आहे. यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण करावे यासाठी मी स्वत: २०१२ पासून मागणी करत आहे. एसआयआर झाले पाहिले या मताचा मी आहे. निवडणूक आयोगाने आता मतदार यांच्यांचे पुनरीक्षण करण्याचा घेतलेला निर्णय स्वागताहार्य आहे. पराभवामुळे विरोधकांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे असे आंदोलने करतात. विरोधकांची नोटचाेरी बंद झाल्याने ते व्होटचारीचा आरोप करत असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.