सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वातील चमूकडून दिवसभर आढावा
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) चमूने मंगळवारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला भेट देऊन विविध सुरक्षा उपाययोजनांची पाहणी केली. मेट्रोच्या प्रवाशी वाहतुकीपूर्वी होणारी ही महत्त्वाची तपासणी आहे.
मेट्रो रेल्वेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्धा मार्गावरील जमिनीवरून धावणाऱ्या ५.५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून तेथे प्रवाशी वाहतूक येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर रेल्वे सुरक्षा आयुक्त अरविंद कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली जे.पी. गर्ग आणि उत्तम प्रकाश यांच्या चमूने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केलेल्या आवश्यक सर्व बाबींची पाहणी केली. दिवसभर विविध प्रकल्पस्थळांना भेटी दिल्यावर सायंकाळी मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांची बैठक झाली व त्यांनी प्रकल्पाशी संबंधित आवश्यक ती माहिती मागवली.
सुरक्षा आयुक्त थेट विमानतळावरून एअरपोर्ट (साऊथ) या स्थानकावर गेले. तेथील सुविधांची पाहणी केली. व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यावेळी उपस्थित होते. एअरपोर्ट ते खापरी या दरम्यान चमूने मेट्रोने प्रवास केला. या दरम्यान सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक सिस्टीमसह इतरही तांत्रिक बाबींची माहिती त्यांनी घेतली तसेच मेट्रो कोचेसमधील सुरक्षा उपकरणांची देखील पाहणी केली.
मिहान डेपोमध्ये झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच प्रकल्पाची प्रगती आणि इतर संबंधित तपशीलांची माहिती चमूने घेतली. तसेच सीएमआरने मिहानमध्ये मेट्रोचा मुख्य मार्ग व डेपोसाठी २४ किलोवॅटचे ट्रॉखन पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोलिक जॅकची माहिती घेतली.
प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या ५-डी बिमप्रणालीवर सुरक्षा आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सायंकाळी झालेल्या बैठकीत आयुक्तांनी प्रकल्पाच्या विविध तपशिलांची माहिती मागवली. यावेळी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेशकुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस विमाथन आणि महाव्यवस्तापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.