भंडारा : सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ प्रसारित होत असतात. साप दिसताच क्षणी लोकांना घाम फुटतो. वाट मिळेल तिथे लोक पळत सुटतात. कारण त्याच्या एका दंशानं सुद्धा आपला मृत्यू होईल ही भिती लोकांना सतावते. परिणामी लोक चुकून सुद्धा सापाच्या वाट्याला जात नाहीत. मात्र जर तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि तिथे एखादा कोब्रा किंवा विषारी साप दिसला तर काय होईल? ही कल्पनाही आपल्याला करवत नाही, मात्र एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत असून एका सापानं चक्क एटीएम मशीनमध्ये घुसखोरी केली.
एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या एका बँक कर्मचाऱ्याला एटीएम मशीनच्या कॅशबॉक्स मधून कसलातरी आवाज आला. कर्मचाऱ्यांनी पाहताच त्याचीही बोबडी वळली. एटीएम मशीनच्या कॅश बॉक्समध्ये एक कोब्रा गुंडाळी मारून बसल्याचे त्याला दिसले. त्याने तात्काळ ही माहिती स्थानिक बँक अधिकाऱ्यांना दिली. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्यात नागपंचमीच्या दिवशी घडली सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच वायरल होतो आहे.
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे मात्र प्रत्यक्षात नाग समोर आल्यावर काय होते याचा अनुभव भंडारा येथील एका बँक कर्मचाऱ्यांनी घेतला. या कर्मचाऱ्याने प्रसंगवधान राखत एटीएम बॉक्स न उघडता बँकेतील इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे अनर्थ टळला.
मोहाडी तालुक्यातील
पिंपळगाव झंझाड येथे कॅनरा बँकेची एक शाखा आहे. या बँकेत नागपंचमीच्या दिवशी एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. नागपंचमीच्या दिवशी नित्यप्रमाणे एक बँक कर्मचारी बँकेच्या एटीएम मशीनमधील कॅश बॉक्समध्ये रक्कम जमा करण्यासाठी गेला. मात्र तेथे त्याला विचित्र आवाज आला मशीनमध्ये काय आहे ते बघण्यासाठी त्याने डोकावून पाहिले असता त्याला मशीनच्या कॅश बॉक्समध्ये साप असल्याचे लक्षात आले . त्यांनी ताबडतोब ही बाब बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना सांगितली.
त्यानंतर तो बॉक्स तसाच बंद ठेवण्यात आला दुसऱ्या दिवशी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्पमित्रांनी कॅश बॉक्स उघडताच त्यातून एका कोब्रा म नागाने फणा बाहेर काढला. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित असलेल्या काही लोकांनी चित्रित केला. त्यानंतर आज सकाळपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ बघून आता बँकेतील कर्मचाऱ्यांसह एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्यांनाही धडकी भरली आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
कॅश बॉक्स उघडताच फणा काढलेला नाग बघून बँकेतील कर्मचारी आणि उपस्थितांच्या अंगावरही काटा उभा राहिला. सर्पमित्रांनी या विषारी नागाची एटीएम बॉक्समधून सुटका करून त्याला सुरक्षित स्थळी त्याच्या अधिवासात सोडले मात्र या घटनेनंतर परिसरात चर्चांना उधाण आलेलं आहे. एटीएम बॉक्सच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्यात यावी व नियमित तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
हा व्हिडिओ प्रसारित होताच अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या, आता सापही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असल्याचे मिश्किलपणे काहींनी म्हटले तर नागिन चित्रपटाची आठवण झाली असेही काहीजण बोलू लागले. तर काहींनी पूर्वी नाग असेच संपत्तीवर किंवा पैशांवर गुंडाळी मांडून बसत असे अशा भन्नाट प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत.