दहावी, बारावीच्या निकालावर करोनाचे सावट; मुंबई-पुणे, औरंगाबादमधील समस्या

देवेश गोंडाणे

विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन झाले असले, तरी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या लाल क्षेत्रातील उत्तरपत्रिका अद्यापही परीक्षा केंद्र, नियामक व टपाल कार्यालयातच पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल कधी लागेल याबाबत शिक्षण मंडळही साशंक आहे.

विभागीय मंडळांकडे उत्तरपत्रिकांचे संकलन झाल्यानंतर निकाल तयार होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागतो हे येथे उल्लेखनीय.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा सुरळीत झाली. परंतु त्यानंतर टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने दहावी भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. दरम्यान, टाळेबंदीमुळे दळणवळणाची साधनेही बंद असल्याने शिक्षकांकडे असलेल्या उत्तरपत्रिका संकलित करणे कठीण झाले होते.

मंडळाने उत्तरपत्रिका ने-आण करण्याची  विशेष परवानगी शासनाकडे मागितली. परवानगी मिळताच शिक्षण मंडळाने जिल्हा स्तरावरुन उत्तरपत्रिकांचे संकलन सुरू केले आहे.

शिक्षण मंडळाच्या नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, कोकण आणि नाशिक या सहा विभागातील उत्तरपत्रिकांचे संकलन ९० ते ९८ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद विभागात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील उत्तरपत्रिकांचे संकलन संथगतीने सुरू आहे. काही भागातील उत्तरपत्रिकांचे ५० टक्के तर काही भागात केवळ २५ टक्केच उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात संकलित झाल्या आहेत. त्यामुळे याचा फटका दहावी आणि बारावीच्या निकालाला बसणार आहे.

साशंकता कायम

मुंबई, पुणे आणि औरंगाबाद विभागातील  उत्तरपत्रिकांचे शंभर टक्के संकलन कधी होईल हे सांगणे कठीण असल्याने शिक्षण मंडळाने निकालाच्या तारखेबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

.. म्हणून निकाल लांबतो

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे बंद केले असले तरी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे पुरस्कार सुरूच असल्याने शिक्षण मंडळाच्या पातळीवर राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. परिणामी इतर विभागांचा निकाल तयार झाला तरी लाल क्षेत्रातील विभागांच्या निकालाची शिक्षण मंडळाला वाट बघावी लागणार आहे.

नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर विभागातील उत्तरपत्रिका संकलन बहुतांश पूर्ण झाले आहे. मात्र, करोनामुळे काही विभागातील स्थिती बिकट असल्याने निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही.

– रविकांत देशपांडे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.