समित्या, मंडळावर नियुक्त्या न झाल्याने नाराजी; महापालिका निवडणुकीत झळ पोहचण्याची शक्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांची गरज भासते, सत्ताधारी पक्षाकडून कार्यकर्त्यांची वेगवेगळय़ा सरकारी समित्यांवर, मंडळावर नियुक्ती देऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीला लावले जाते. मात्र दोन वर्ष होऊनही सत्ताधारी महाविकास आघाडीने बहुतांश समित्यांवर नियुक्त्याच केल्या नसल्याने कार्यकर्ते निराश आहेत. त्यांची ही निराशा आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीतील घटक पक्षांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

सलग पंधरा वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी कंबर कसली. या पक्षाचे केंद्रीय मंत्री भूमिपूजनाच्या निमित्ताने शहर िपजून काढत आहेत. कार्यकर्त्यांच्या घरी जात आहे. विशेष म्हणजे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनेच्या अंमलबजावणीत त्यांना सहभागी करून घेतले जात आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादी व सेनेत इच्छुकांकडून अर्ज मागवण्यापलीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. याबाबत आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी समित्या, मंडळे, महामंडळांवर होणाऱ्या नियुक्ता न होणे हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मोजक्याच विभागाच्या समित्यांची घोषणा केली. अजूनही एमएमआरडीए, जि.प. सदस्यांच्या नियोजन समितीवरील नियुक्त्या, विशेष कार्यकारी दंडाधिकारी व तत्सम प्रकारच्या नियुक्त्या होणे बाकी आहे. महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने नियुक्त्या लांबल्याचा दावा कार्यकर्ते करतात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या होणे आवश्यक होत्या, त्या झाल्या असत्या तर कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला असता, ते पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या कामात उतरले असते. आता त्यांच्या पातळीवर शिथिलता असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते खासगीत सांगतात. विलंबासाठी सेनेचे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीला दोष  देतात.

पक्षासाठी झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आता इतिहासजमा झाली आहे. प्रत्येकाला अपेक्षा असते, नेत्यांमागे किती काळ फिरणार असे म्हणणारे कार्यकर्ते आता अधिक आहेत. पाच वर्षांनंतर पक्ष सत्तेत आल्याने व जिल्ह्यातील दोन मंत्री असल्याने अपेक्षा अधिक आहे.  महाविकास आघाडीच्या विरुद्ध आंदोलन करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेत अनेक घोटाळे पुढे आले असताना त्या विरुद्ध मोठे आंदोलन उभे करण्याची संधी महाविकास आघीडीकडे होती. नेते आणि कार्यकर्तेही शांत बसले, याकडे नेत्याने लक्ष वेधले.

निवडणुकीपूर्वी महामंडळावरील नियुक्त्या जाहीर करा – पनकुले

महापालिका निवडणुकीपूर्वी जिल्हास्तरीय समित्यांवर नियुक्त्या व महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर करा,अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले यांनी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदनातून केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committees dissatisfied non appointment board possibility reach municipal elections ysh
First published on: 08-03-2022 at 02:11 IST