scorecardresearch

तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींवर दबाव!; विद्यापीठ छळ प्रकरण

शैक्षणिक वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या विद्यापीठ छळ प्रकरणातील तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींवर विविध माध्यमातून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : शैक्षणिक वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या विद्यापीठ छळ प्रकरणातील तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींवर विविध माध्यमातून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. दोन तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींपैकी एक दिव्यांग असून प्रशासनच जर आमच्या बाजूने नसेल तर न्याय कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांच्याविरोधात पीएच.डी.च्या दोन विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे. डॉ. पांडे यांनी पीएच.डी. आराखडा मंजुरीसाठी आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात रोज नवनवे पुरावे समोर येत आहेत. डॉ. पांडे यांनी नुकतेच पाच हजार रुपये परत केल्याची माहिती समोर आल्यानंतर आता तक्रार मागे घ्या, अन्यथा पीएच.डी. करण्यात अनेक अडचणी निर्माण करू, अशी धमकी विद्यार्थिनींना दिली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थिनी प्रचंड घाबरल्या आहेत. त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे. विद्यापीठ प्रशासन आरोपींना सहकार्य करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, विधिसभेच्या सदस्यांनी विद्यार्थिनींना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

शिक्षक प्रशिक्षणासाठी घेतले पैसे

विद्यापीठाच्या विभागांमध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. यासाठी काही शुल्क आकारले जाते. या दोन्ही विद्यार्थिनी पीएच.डी. करत असताना त्यांचा या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नव्हता. तरी त्यांना यासाठी ५०० रुपये मागण्यात आले. त्यामुळे डॉ. पांडे हे  पैसे न घेतल्याचा आव आणत असले तरी  शिक्षक प्रशिक्षणाची जबरदस्ती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हिंदी विभागातील कंत्राटी प्राध्यापकाचाही समावेश?

विद्यापीठाच्या हिंदी विभागातील एका कंत्राटी प्राध्यापकाचाही या छळ प्रकरणात हात असल्याची माहिती समोर येत आहे. काही विधिसभा सदस्यांकडे यासंदर्भात ठोस पुरावे असून डॉ. पांडे यांनी याआधीही या कंत्राटी प्राध्यापकाला हाताशी धरून असे गैरप्रकार केल्याची माहिती सदस्यांनी दिली. विशेष म्हणजे, या कंत्राटी प्राध्यापकाला विभागात घेण्यासाठी इतर होतकरू प्राध्यापकांना डावलण्यात आल्याचाही आरोप आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Complainants put pressure students university harassment case ysh

ताज्या बातम्या