नागपूर : वर्धा जिल्ह्यातील नऊ महिन्यांच्या दुर्धर हृदयविकार असलेल्या बालकाला दूध पिताना दम लागून श्वास थांबत होता. न्यू ईरा मदर ॲन्ड चाईल्ड हाॅस्पिटलच्या बाल हृदय शल्यचिकित्सक डॉ. संदीप खानझोडे आणि डॉ. आनंद संचेती यांच्या चमूने गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने बालकाला जीवदान मिळाले.

या बाळाचा जन्म झाल्यावर त्याला वारंवार निमोनिया होत होता. बालकाने दूध पिल्यास थोड्याच वेळात त्याला दम लागण्यासह श्वासही थांबत होता. त्याला तेथील रुग्णालयात दाखवले गेले. तेथील डॉक्टरांनी नागपुरातील न्यू ईरा मदर अँड चाईल्ड हॉस्पिटलला पाठवले. या रुग्णालयात डॉ. संदीप खानजोडे आणि डॉ. आनंद संचेती यांनी बालकाच्या विविध तपासणी केल्यावर त्याला हृदयाचा दुर्गम आजार (जन्मजात ॲसिनोटिक हृदयरोग) असल्याचे पुढे आले. या आजारात बालकाच्या हृदय आणि फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांत दोष असल्याने शरीराला शुद्ध रक्तपुरवठा होत नव्हता. कुटुंबीयांच्या परवानगीने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा निर्णय झाला.

हेही वाचा >>> राज्यभरात आयटीआयमध्ये १,५४,३९२ जागा, कसा घेणार प्रवेश?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी शस्त्रक्रियेमुळे बालकाला जीवनदान मिळाले. उपचारात भूलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत बोबडे, डॉ. आनंद भुतडा, डॉ. रोहित असरानी, डॉ. कल्याणी कडू, डॉ. नीरव पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. लहान मुलांमध्ये हृदयाला छिद्रासह इतरही हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचे आजार वाढत आहेत. या रुग्णांपैकी एक टक्के रुग्णांमध्ये हा आजार आढळतो. या नऊ महिन्याच्या बालकावर शस्त्रक्रिया करताना बरेच आव्हान होते. परंतु, चमूच्या यशस्वी प्रयत्नाने बालकाचा त्रास दूर करणे शक्य झाले, असे मत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संचेती यांनी व्यक्त केले.